भारतातील मुलांची इम्युनिटी चांगली; शाळा सुरू करण्यावर विचार केला पाहिजे : रणदीप गुलेरिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 08:36 AM2021-07-20T08:36:53+5:302021-07-20T08:39:34+5:30
School Reopening : दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून देशभरात बंद आहेत शाळा. शाळा सुरू करण्यावर विचार केला गेला पाहिजे, असं गुलेरिया यांचं मत.
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला होता. त्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. परंतु लहान मुलांसाठी अद्यापही लस उपलब्ध नाही. दरम्यान, देशात तिसरी लाटही येऊ शकते, अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. यादरम्यान, एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशातील शाळा उघडण्यावर विचार केला गेला पाहिजे, असं मत व्यक्त केलं.
"मला असं वाटतं की आता आपल्याला देशातील शाळा पुन्हा सुरू करण्यावर एकमत केलं पाहिजे," असं रणदीप गुलेरिया म्हणाले. इंडिया टुडेशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. भारतात अनेक शाळा कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच बंद आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत काही ठिकाणी १० वी आणि १२ वीचे वर्ग भरवण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा बंद करण्यात आले.
"ज्या ठिकाणी कोरोना विषाणूच्या केसेस कमी आहेत, त्या ठिकाणच्या शाळा सुरू करण्याबाबत मी सांगत आहे. ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या ठिकाणी अशी योजना आखली जाऊ शकते. परंतु संसर्ग पुन्हा वाढताना दिसल्यास त्या पुन्हा बंद केल्या जाऊ शकतात. परंतु जिल्ह्यांनी एका दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यावर विचार केला पाहिजे आणि शाळा सुरू करण्याच्या योजना आखल्या पाहिजे," असंही ते म्हणाले.
मुलांमध्ये चांगली इम्युनिटी
"मुलांच्या एकूण विकासात शालेय शिक्षणाचा अतिशय महत्त्व आहे. ऑनलाईन वर्गांपेक्षा मुलांना शाळेतील वर्गांमध्ये जाणं आवश्यक आहे. भारतात अतिशय कमी प्रमाणात मुलांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि ज्यांना ती झाली आहे ते आपली इम्युनिटी चांगली असल्यामुळे लवकर बरे होण्यास सक्षम आहेत. सीरो सर्व्हेमध्ये याचा खुलासा झाला की मुलांमंध्ये वयस्क लोकांपेक्षा अधिक प्रमाणात अँटिबॉडिज आहेत. यामुळे शाळा उघडल्या गेल्या पाहिजे. जितकं शाळेत शिक्षण सोपं असतं तितकं ते ऑनलाईनमध्ये नाही," असंही गुलेरिया यांनी स्पष्ट केलं.