त्यावेळी पाकिस्तानने जिनिव्हा अॅक्टचे उल्लंघन करून भारतीय वैमानिकाची केली होती हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 08:13 PM2019-02-27T20:13:48+5:302019-02-27T20:14:31+5:30
पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय हवाई दलाने हाणून पाडला होता. मात्र यावेळी झालेल्या चकमकी भारताचे एक विमान कोसळले. तसेच एक वैमानिका पाकिस्तानच्या तावडीत सापडला आहे.
नवी दिल्ली - भारताने बालाकोट येथील दहशतवादी तळावर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय हवाई दलाने हाणून पाडला होता. मात्र यावेळी झालेल्या चकमकी भारताचे एक विमान कोसळले. तसेच एक वैमानिका पाकिस्तानच्या तावडीत सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण देश चिंतीत आहे. मात्र जिनिव्हा कायद्याचे संरक्षण असल्याने युद्धबंदी असलेल्या भारतीय वैमानिकाच्या सुटकेची भारताला आशा आहे. पण पाकिस्तानच्या पूर्वोतिहासामुळे काही प्रमाणात चिंताही आहे. त्याचे कारण म्हणजे 1999 च्या कारगील युद्धा वेळी विमान कोसळून पाकिस्तानी सैनिकांच्या तावडीत सापडलेल्या एका भारतीय वैमानिकाची पाकिस्तानने हत्या केली होती. स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा असे त्यांचे नाव होते.
1999 साली भारत आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये कारगिलमध्ये झालेल्या युद्धावेळी भारतीय हवाई दलाने मोलाची भूमिका बजावली होती. त्यावेळी हवाई दलाने ऑपरेशन सफेद सागर राबवून पाकिस्तानी घुसखोरांचे कंबरडे मोडले होते. त्या दरम्यान स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांच्याकडे भारतीय हद्दीत लपलेल्या पाकिस्तानी सैनिकांची पोझिशन शोधण्याचे काम सोपवण्यात आले होते. मात्र या मोहिमेदरम्यान 27 मे रोजी त्यांचे विमान शत्रूच्या हल्ल्यात सापडून कोसळले. यावेळी विमानातून पॅराशूटच्या मदतीने बाहेर पडलेले आहुजा पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडले. मात्र त्यांना युद्धकैद्यासारखी वर्तणूक न देता पाकिस्ताननी सैनिकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती.
पाकिस्तानने स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांना जिन्हिवा कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. मात्र आहुजा यांचा मृत्यू विमानातून पडून झाल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. पण आहुजा यांची हत्या झाल्याचे शवविच्छेदनात उघड झाले होते. भारत सरकारने स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांना मरणोपरांत वीर चक्र देऊन सन्मानित केले होते.