यंदाही कडाडणार डाळी !
By admin | Published: April 17, 2016 03:45 AM2016-04-17T03:45:02+5:302016-04-17T03:45:02+5:30
सर्वसामान्य भारतीयांचे हक्काचे प्रोटीन म्हणजे डाळ. गतवर्षीप्रमाणे यंदाही डाळींचे भाव पुन्हा एकदा प्रतिकिलो २00 रुपयांची मर्यादा ओलांडणार आहेत. व्यापाऱ्यांकडे डाळींचा साठा नसल्याने,
- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
सर्वसामान्य भारतीयांचे हक्काचे प्रोटीन म्हणजे डाळ. गतवर्षीप्रमाणे यंदाही डाळींचे भाव पुन्हा एकदा प्रतिकिलो २00 रुपयांची मर्यादा ओलांडणार आहेत. व्यापाऱ्यांकडे डाळींचा साठा नसल्याने, सध्याच्या भावात लवकरच २५ ते ३0 टक्क्यांची वाढ होईल, अशी भीती इंडियन डाळ मिलच्या एका प्रतिनिधीने वर्तविली आहे.
बाजारपेठेत डाळींची उपलब्धता लक्षात घेता, उडदाच्या डाळीच्या किरकोळ विक्रीचा भाव यंदा २५0 रुपये प्रतिकिलोची विक्रमी उंची गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षीपर्यंत व्यापारी या काळात विविध देशांमधून किमान २५ लाख टन आयात डाळींचा साठा करीत असत. गतवर्षी डाळींचे भाव २00 रुपये किलोवर पोहोचताच सरकारने व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. साठेबाजीच्या आरोपाची तशीच संकटे यंदा निर्माण होऊ नयेत, यासाठी व्यापारी यंदा डाळींचा अधिक साठा करायला तयार नाहीत. डाळींची मर्यादित आयात झाल्यामुळे जेमतेम १0 लाख टन डाळींचा साठा सध्या बाजारपेठेत आहे असे सांगण्यात येते. थोडक्यात, मोदी सरकारच्या काळात यंदाही डाळींच्या उपलब्धतेची अवस्था कठीणच दिसत आहे.
साठा का करणार नाहीत?
गतवर्षी डाळींच्या भावाने प्रथमच २00 रुपये किलोची पातळी गाठली होती. त्यामुळे देशभर हाहाकार उडाला होता. या पार्श्वभूमीवर डाळींचा साठा केला, तर भरपूर दंड भरावा लागेल.
प्रसंगी तुरुंगाची हवाही खावी लागेल, या भीतीने व्यापाऱ्यांनी यंदा डाळींचा साठा करण्याचे टाळले. इतकेच नव्हे, तर गतवर्षीच्या तुलनेत डाळींची आयात कमी केली.
- मार्च महिन्यापासून हरभऱ्याचे नवे पीक हाती आल्यानंतर वस्तूत: चणा डाळीचे दर उतरायला लागतात. यंदा एप्रिल महिन्याचा मध्य उजाडला, तरी तशी चिन्हे दिसत नाहीत.