तिरुपती देवस्थानवर ठेवींच्या व्याजातून खर्च करण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 05:02 AM2020-08-30T05:02:30+5:302020-08-30T05:02:57+5:30
भगवान व्यंकटेश्वराच्या या देवस्थानच्या विविध बँकांमध्ये मिळून सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. वेळोवेळी उपलब्ध होणाºया जास्तीच्या रकमेतून ठेवलेल्या या ठेवी तीन महिने, सहा महिने किंवा एक वर्ष मुदतीसाठी ठेवलेल्या आहेत.
तिरुपती : कोरोनामुळे गेले चार महिने भक्तांचा राबता बंद होऊन दानपेटीत खडखडाट झाल्याने देशातील सर्वात श्रीमंत तिरुमला तिरुपती देवस्थावर कर्मचाऱ्यांच्या पगारांसह अन्य प्रासंगिक खर्च भागविण्यासाठी बँकांमधील ठेवींच्या व्याजावर विसंबून राहण्याची वेळ आली आहे.
भगवान व्यंकटेश्वराच्या या देवस्थानच्या विविध बँकांमध्ये मिळून सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. वेळोवेळी उपलब्ध होणाºया जास्तीच्या रकमेतून ठेवलेल्या या ठेवी तीन महिने, सहा महिने किंवा एक वर्ष मुदतीसाठी ठेवलेल्या आहेत. ठेवींवरील व्याज मुदत संपल्यावर एकदम मिळते.
परंतु सध्याच्या तंगीच्या काळात मासिक खर्चासाठी पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी बँकांमधील या सर्व ठेवींची मुदत एक महिन्याची करण्याचा निर्णय देवस्थानच्या व्यवस्थापन समितीने घेतला.
यामुळे प्रत्येक ठेवीची मुदत एक महिन्याने संपल्यावर व्याजाची रक्कम प्रासंगिक खर्चासाठी उपलब्ध होईल. फेब्रुवारीत मंजूर केलेल्या देवस्थानच्या बजेटनुसार या ठेवींवर संपूर्ण वर्षभरात ७०६ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे.