तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 11:03 AM2024-09-20T11:03:36+5:302024-09-20T11:05:43+5:30

Tirupati Laddu Controversy : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची मागणी केली आहे.

‘Time to constitute Sanatana Dharma Rakshana Board’: Pawan Kalyan amid row over Tirupati laddoos | तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"

तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"

अमरावती : तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचे उघडकीस आल्यापासून राजकारण चांगलेच तापलं आहे. मागील राज्य सरकारच्या कार्यकाळात तिरुपती बालाजी देवस्थानतर्फे प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडू बनविण्यासाठी निकृष्ट पदार्थ व प्राण्याच्या चरबीचा वापर सुरू केला होता, असा अहवाल गुजरातमधील एका प्रयोगशाळेनं दिला. 

त्यामुळं यासंदर्भात आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या आरोपांना बळकटी मिळाल्याचा टीडीपीचा दावा आहे. तर नायडू राजकीय स्वार्थासाठी अतिशय हीन स्वरूपाचे व खोटे आरोप करत असल्याची टीका वायएसआर काँग्रेस पार्टीने (वायएसआरसीपी) केली आहे. यातच आता आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची मागणी केली आहे.
 
याबाबत उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सोशल मीडियावर भाष्य केलं आहे. "तिरुपती बालाजी प्रसादमध्ये प्राण्यांची चरबी (माशाचे तेल, डुकराचे मांस आणि गोमांस फॅट) मिसळली जात असल्यानं आम्ही सर्वजण खूप हैराण झालो आहोत. तत्कालीन वायसीपी सरकारद्वारे स्थापन झालेल्या टीटीडी बोर्डाला अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागलीत. आमचे सरकार कठोर कारवाई करण्यासाठी वचनबद्ध आहे, परंतु, हे मंदिरांचे अपवित्रीकरण, जमिनीचे प्रश्न आणि इतर धार्मिक प्रथांशी संबंधित अनेक समस्यांवर प्रकाश टाकते", असं पवन कल्याण यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

याचबरोबर, पुढे ते म्हणाले, "आता भारतातील मंदिरांशी संबंधित सर्व मुद्द्यांवर विचार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर 'सनातन धर्म रक्षण बोर्ड' स्थापन करण्याची वेळ आली आहे. यावर राष्ट्रीय पातळीवर सर्व धोरणकर्ते, धर्मप्रमुख, न्यायव्यवस्था, नागरिक, मीडिया आणि आपापल्या क्षेत्रातील इतर सर्वांनी चर्चा केली पाहिजे. सनातन धर्माचा कोणत्याही स्वरूपात अपमान करणं थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं मला वाटतं, असंही पवन कल्याण यांनी म्हटलं आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी केला होता आरोप
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मागील जगन मोहन सरकारवर तिरुपती मंदिराच्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप केला होता. बुधवारी (१८ सप्टेंबर) मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले होते की, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावला आहे. त्यांनी अन्नदानमच्या गुणवत्तेशी तडजोड केली आहे.

Web Title: ‘Time to constitute Sanatana Dharma Rakshana Board’: Pawan Kalyan amid row over Tirupati laddoos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.