राजस्थानमध्ये होणार सत्तापालट; काँग्रेसला कौल, पंतप्रधान म्हणून मोदीच हवेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 09:21 PM2018-11-01T21:21:28+5:302018-11-01T21:21:59+5:30
सत्ताधारी भाजपा सरकारला फटका बसणार असून काँग्रेसला सत्ता स्थापनेचा कौल मिळेल
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये सध्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा सरकारला फटका बसणार असून काँग्रेसला सत्ता स्थापनेचा कौल मिळेल, असा अंदाज एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. टाइम्स नाऊ - सीएनएक्सच्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणानुसार ही माहिती समोर आली आहे.
कोणाला किती जागा
राजस्थानमध्ये विधानसभेसाठी एकूण 200 जागा आहेत. या सर्वेक्षणानुसार, पक्षीय बलाबल पाहिले असता काँग्रेसला 110-120 तर भाजपाला 70-80 जागा मिळतील. तर, बीएसपी 1-3 आणि इतर पक्षांना 7-9 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
वसुंधरा राजेंच्या कामगिरीवर नाराजी...
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंदिया यांच्या कामगिरीवर लोकांनी नाराजी व्यक्ती केली आहे. 48 टक्के लोकांनी कामकाज खराब असल्याचे म्हटले आहे. तर 35 टक्के लोकांनी चांगली कामगिरी केल्याचे नोंदविले आहे.
पंतप्रधान म्हणून मोदीच हवेत
राजस्थानमध्ये भाजपाला जनतेने कौल दिला नसला तरी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना पसंती दर्शविली आहे. राजस्थानमध्ये 69 टक्के लोकांना नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान व्हावे असे वाटते. तर फक्त 23 टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींच्या बाजूने कौल दिला आहे. तसेच, दोन टक्के लोकांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना समान मत दर्शविले आहे. तीन टक्के लोकांनी दोघांनाही नापसंती दाखविली आहे. तर, तीन टक्के लोकांनी काहीच मत मांडले नाही.