माजी मुख्यमंत्र्यांनी शेळीचं दूध काढल्यानं उडवली टिंगल; आता ‘ती’ शेळी विकत घेणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 11:43 AM2022-04-25T11:43:01+5:302022-04-25T11:43:20+5:30
परमजित खरडमध्ये आरोग्य विभागात रुग्णवाहिका चालक आहेत. परमजित सिंग यांना अटक झाल्यामुळे लोक संभ्रमात पडले.
बलवंत तक्षक
चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री असताना चरणजित सिंग चन्नी रस्त्याच्या कडेला ज्या शेळीचे दूध काढण्यासाठी थांबले होते, ती शेळी विकत घेणाऱ्यास अचानक पोलिसांनी अटक केली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भदौड मतदारसंघात मध्येच आपला ताफा थांबवून चन्नी शेळीचे दूध काढू लागले. हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
शेळीचे मालक पाला खान यांचे म्हणणे असे की, ‘चमकौर साहिबहून काही लोक शेळी विकत घ्यायला आले होते.’ परमजित सिंग म्हणाले की, ‘चन्नी यांनी शेळीचे दूध काढल्यानंतर समाजमाध्यमांवर त्यांची बरीच टिंगल उडवली गेली होती म्हणून मी दु:खी होतो. दु:खी मनाने मी शेळी विकत घेतली.’ परमजित खरडमध्ये आरोग्य विभागात रुग्णवाहिका चालक आहेत. परमजित सिंग यांना अटक झाल्यामुळे लोक संभ्रमात पडले. यावर पोलिसांनी म्हटले की, ‘परमजित सिंग यांचे त्यांच्याच भावाशी काही भांडण आहे. त्यातून त्यांच्यावर कलम १०७,१५१ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.