टिप्परच्या म्होरक्यासोबत पार्टी : तीन पोलीस निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2016 11:49 PM2016-06-24T23:49:25+5:302016-06-25T00:11:48+5:30
नाशिक : सिडकोतील कुविख्यात टिप्पर गँगचा म्होरक्या समीर पठाण यास न्यायालयीन सुनावणीनंतर पार्टीसाठी घेऊन जाणे कैदी पार्टीतील तीन पोलीस कर्मचार्यांना चांगलेच महागात पडले आहे़ या तिघांनाही पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी निलंबित केले असून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे़

लूट, खंडणी, पोलिसांना मारहाण यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला समीर पठाण हा सद्यस्थितीत नाशिकरोड मध्यवर्ती तुरुंगात आहे़ काही महिन्यांपूर्वी त्याची न्यायालयात सुनावणी असल्याने त्यास न्यायालयात आणण्याची जबाबदारी कैदी पार्टीतील पोलीस हवालदार प्रमोद जाधव, शिपाई राहुल धोंगडे व सागर बोधले यांच्यावर होती़ या दिवशी न्यायालयीन सुनावणी लवकर संपल्याने पठाण यास कारागृहात नेणे आवश्यक होते़
मात्र कैदी पार्टीतील पोलीस कर्मचार्यांनी पठाणची तुरुंगात रवानगी करण्याऐवजी त्यास खासगी वाहनाने त्र्यंबकेश्वर रोडवर घेऊन गेले़ त्यानंतर दोन एक तासाने हे सर्व पुन्हा कोर्टात आले़ पोलिसांचे वाहन उपलब्ध नसल्याचे कारण दाखवून या तिघांनी त्यास सायंकाळी सात वाजता मध्यवर्ती कारागृहात सोडले़ पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन व पोलीस उपायुक्त विजय पाटील यांना ही माहिती मिळताच त्यांनी तिघा पोलीस कर्मचार्यांना निलंबित केले असून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे़
दरम्यान, हे तिघे पोलीस कर्मचारी समीर पठाण व सराईत गुन्हेगार गण्या कावळ्यासोबत सिन्नर येथे मटण पार्टी करण्यासाठी गेल्याची चर्चा आहे़ या तिघांच्या चौकशीतून सराईत गुन्हेगारांसोबत पोलिसांचे असलेले संबंध समोर आले आहेत़ (प्रतिनिधी)