राष्ट्रपतींकडून टिपू सुलतान यांचा गौरव, भाजपा नेत्यांची झाली अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:44 AM2017-10-26T04:44:46+5:302017-10-26T04:45:12+5:30
बंगळुरू : टिपू सुलतान यांना ब्रिटिशांशी लढताना वीरमरण आले. त्यांनी विकासाला गती दिली आणि युद्धात म्हैसूर अग्निबाणांचा वापर केला, अशा शब्दांत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी बुधवारी टिपू सुलतान यांचा गौरव केला.
बंगळुरू : टिपू सुलतान यांना ब्रिटिशांशी लढताना वीरमरण आले. त्यांनी विकासाला गती दिली आणि युद्धात म्हैसूर अग्निबाणांचा वापर केला, अशा शब्दांत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी बुधवारी टिपू सुलतान यांचा गौरव केला. टिपू सुलतान जयंतीवरून भाजपा आणि काँग्रेस पक्षात जोरदार संघर्ष सुरू असताना राष्ट्रपतींनी केलेल्या या गौरवाने काँग्रेसला नैतिक आधार मिळाला आहे.
कर्नाटक विधानसभेच्या हिरक महोत्सवी समारंभानिमित्त विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनात ते बोलत होते. टिपू सुलतान यांनी अग्निबाणासाठी वापरलेले तंत्र नंतर युरोपीयनांनी घेतले, असे कोविंद म्हणाले.
कोविंद यांचा टिपू सुलतान यांचा गौरव करणारा मजकूर वाचून होताच सत्ताधारी काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी बाके वाजवून आनंद व्यक्त केला. त्याच वेळी विरोधी भाजपाच्या बाकांवर कमालीची शांतता होती. फिल्ड मार्शल के. एम. करिअप्पा आणि जनरल के. एस. थिमय्या हे कर्नाटकचे सुपुत्र होते, असे कोविंद म्हणाले. कर्नाटक ही शक्तिशाली जवानांची भूमी आहे. कृष्णदेव राय हे विजयनगर साम्राज्याचे महान राजे होते. ते भारतीयांसाठी प्रेरणादायी आहेत. केम्पे गौडा हे बंगळुरूचे संस्थापक होते. किट्टूरच्या राणी चेन्नम्मा आणि राणी अब्बक्का यांनी वसाहतीच्या राजवटीविरुद्धच्या सुरुवातीच्या लढायांचे नेतृत्व केले, असे राष्ट्रपती म्हणाले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी टिष्ट्वटरवर ‘माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटक विधिमंडळात मुत्सद्द्याला साजेसे असे भाषण केल्याबद्दल आभार,’ या शब्दांत आभार मानले. (वृत्तसंस्था)
>केंद्रीय मंत्र्याने केला होता विरोध
टिपू सुलतान यांची जयंती १0 नोव्हेंबर रोजी साजरी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यापासून, काँग्रेस व भाजपा यांच्यात शाब्दिक संघर्ष सुरू आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारचे टिपू सुलतान जयंतीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण फेटाळून लावत, तो कार्यक्रम ‘लाजिरवाणा’ असल्याचे म्हटले होते. जयंती कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याची पक्षाची भूमिका असल्याचे भाजपाचे आमदार अश्वथ नारायण यांनी म्हटले होते.