जगभरात ठिकठिकाणी फडकला ‘तिरंगा प्यारा’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 05:51 AM2019-08-16T05:51:29+5:302019-08-16T05:52:02+5:30

जगभरात पसरलेल्या भारतीय दूतावासांमध्ये गुरुवारी मोठ्या उत्साहात भारताचा ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. मोठ्या संख्येने भारतीय सहभागी झाले होते.

'Tiranga' flies everywhere in the world | जगभरात ठिकठिकाणी फडकला ‘तिरंगा प्यारा’

जगभरात ठिकठिकाणी फडकला ‘तिरंगा प्यारा’

googlenewsNext

बीजिंग/ मेलबोर्न : जगभरात पसरलेल्या भारतीय दूतावासांमध्ये गुरुवारी मोठ्या उत्साहात भारताचा ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. मोठ्या संख्येने भारतीय सहभागी झाले होते. आॅस्ट्रेलिया, चीन, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिरात, नेपाळ, सिंगापूर, इस्रायल, इंडोनेशिया आणि अनेक देशांमध्ये ध्वजारोहणासोबतच राष्टÑगीत आणि देशभक्तिपर गीते गायली गेली.
चीनमधील भारतीय दूतावासात आयोजित कार्यक्रमात अनेक भारतीय सहभागी झाले होते. भारतीय राजदूत विक्रम मिस्री यांनी राष्टÑपती रामनाथ कोविंद यांचे देशवासीयांना उद्देशून केलेले भाषण वाचून दाखविले. आॅस्ट्रेलियातील कॅनबेरा तसेच मेलबोर्न, सिडनी आणि पर्थ येथील भारतीय वकिलातीत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भारतीय नागरिक उपस्थित होते. नेपाळमधील भारतीय दूतावासाने स्वातंत्र्यदिनानिमित्त नेपाळच्या स्थानिक रुग्णालयांना ३० रुग्णवाहिका आणि सहा बसेस भेट दिल्या. इस्रायलच्या हर्झलिया शहरात स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाला ३०० पेक्षा जास्त मूळ भारतीय नागरिकांनी हजेरी लावली होती. श्रीलंका, बांग्लादेश,थायलंडची राजधानी बँकॉक, दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया, रशिया, ओमान, हेग (नेदरलँड) विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

जागतिक नेत्यांकडून मोदींना शुभेच्छा
भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जागतिक नेत्यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा पाठवून सद्भावना व्यक्त केल्या. भारत हा आमचा निकटस्थ मित्र असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह, नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली, भूतानचे पंतप्रधान एल. त्शेरिंग आदींचा सर्वप्रथम शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये समावेश होता.


भारताशी मैत्री वृद्धिंगत- अमेरिका
गेल्या दोन दशकात भारतासोबतची मैत्री आणखी बळकट होऊन सामरिक भागीदारीपर्यंत पोहोचली आहे. संरक्षण आणि दहशतवादविरोधी लढ्यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर दोन देश आता सहकार्य करीत आहेत, असे अमेरिकेचे विदेशमंत्री माईक पोम्पीओ यांनी म्हटले. दोन्ही देश लोकशाही मूल्यांचे आदानप्रदान करीत असून जनतेचे परस्पर संबंध बळकट होत असून आर्थिक विकासामुळे संबंध आणखी वृद्धिंगत झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: 'Tiranga' flies everywhere in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.