शिक्षणाच्या जिद्दीपुढे फिकी वाघाची डरकाळी
By Admin | Published: August 11, 2016 01:20 AM2016-08-11T01:20:25+5:302016-08-11T01:20:25+5:30
शिक्षणाची जिद्द असेल, तर कुठल्याही अडचणींवर मात करता येऊ शकते. साक्षात वाघ जरी समोर येऊन उभारला तरी तो तुमचा रस्ता अडवू शकत नाही.
चेन्नई : शिक्षणाची जिद्द असेल, तर कुठल्याही अडचणींवर मात करता येऊ शकते. साक्षात वाघ जरी समोर येऊन उभारला तरी तो तुमचा रस्ता अडवू शकत नाही. कदाचित अतिशयोक्ती वाटणारी ही परिस्थिती तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मात्र वस्तुस्थिती आहे; पण वाघाच्या भीतीपोटी शाळा सोडणाऱ्या या मुलांसाठी सरकारने जीप उपलब्ध करून दिली आणि या विद्यार्थ्यांच्या जिद्दीपुढे वाघाची डरकाळीही फिकी पडली.
तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील मदुमलाई येथील प्राथमिक विद्यालयात पुलियालम, मुंडाकराई, मेलनागम पल्ली आणि कप्पूर येथील किमान १०० कुटुंबांतील विद्यार्थी येतात; परंतु या भागात वाघ आणि अन्य जंगली जनावरांच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांनी शाळेत जाणेच बंद केले होते. राज्याचे शिक्षणमंत्री पी. बेंजामिन यांनी सांगितले की, सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या आत्मरक्षा कार्यक्रमामुळे या विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण झाला. विधानसभेत शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, आदिवासी समूह या भागात राहतो. या परिसरात वाघ, बिबटे, अस्वल, लांडगे, रानमांजर अशी जंगली जनावरे आहेत.
या जनावरांच्या भीतीपोटी या मुलांनी शाळेत येणेच सोडले होते; पण सरकारने या विद्यार्थ्यांसाठी जीपची सोय केली आणि ४५ विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेचा रस्ता पकडला.