तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 08:02 PM2024-09-20T20:02:34+5:302024-09-20T20:03:18+5:30
Tirupati Laddu Prasadam Controversy News: तिरुमला तिरुपती लाडू प्रसादम वाद प्रकरणात माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी पहिली प्रतिक्रिया देताना विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंवर पलटवार केला आहे.
Tirupati Laddu Prasadam Controversy News: देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडू वादाचा मुद्दा ठरत आहे. तिरुमला तिरुपती मंदिरात दिल्या जात असलेल्या लाडू प्रसादात जनावरांची चरबी आणि माशांचे तेल वापरण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला. यानंतर आता यावरून देशभरात चर्चांना उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या टीकेला माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
तिरुपती लाडू प्रसादम वादावर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले की, प्रसादाचा दर्जा नेहमीच चांगला असतो. थोडासा प्रसाद मिळाला तरी तो प्रत्येकासाठी महाप्रसादासारखा असतो. हे अत्यंत श्रद्धेने केले जाते. प्रसादासाठी निवडलेले साहित्य अत्यंत विश्वासार्ह गट, कंपन्यांकडून खरेदी केले जाते. सर्व काही अतिशय संघटित पद्धतीने साध्य केले जाते. त्या भागाचे उल्लंघन किंवा बदल करण्याचे धाडस कोणी केले नाही. या प्रकरणाची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून एक अहवाल मागवला आहे. या प्रकरणी आता माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान आणि सरन्यायाधीशांना पत्र लिहिणार
वायएसआरसीपीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी स्वतः पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे. भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिणार आहे. चंद्राबाबू नायडू यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास कसा केला आणि तसे केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का करू नये, हे त्यांना समजावून सांगणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अशी व्यक्ती आहे की, जी राजकीय फायद्यासाठी देवाचा वापर करू शकते. चंद्राबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेशातील १०० दिवसांच्या कारकिर्दीवरून लक्ष हटवण्यासाठी तूप भेसळीचे आरोप करण्यात आल्याचा प्रतिदावा जगन मोहन रेड्डी यांनी केला.
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले होते की, गेल्या ५ वर्षांत जगन मोहन सरकार, वायएसआरसीपीच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदाल यांनी या प्रकरणी जगन मोहन रेड्डी, कंत्राटदार आणि टीटीडी अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप मिसळून त्यांनी लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळ केला असल्याचे त्यात म्हटले आहे. केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याप्रकरणी सविस्तर अहवाल मागवला आहे.