तिरुपती बालाजी मंदिराचा मोठा निर्णय; भक्तांना दर्शनासाठी नो एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 04:02 PM2018-07-15T16:02:17+5:302018-07-15T16:06:54+5:30
पहिल्यांदाच मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 11 ते 17 ऑगस्ट या सहा दिवसांत भाविकांना दर्शन घेता येणार नाही.
नवी दिल्ली : देशातील सर्वांत प्रसिद्ध असलेले तिरुपती बालाजी मंदिर सहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. आंध्रप्रदेशातील तिरुमाला येथे भगवान व्यंकटेश्वरचे हे मंदिर आहे. पहिल्यांदाच मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 11 ते 17 ऑगस्ट या सहा दिवसांत भाविकांना दर्शन घेता येणार नाही.
मंदिर प्रशासनाने हा निर्णय महासंप्रोक्षण अनुष्ठान करण्याकरता घेतला आहे. तब्बल 12 वर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 11 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 17 ऑगस्टच्या सकाळी 6 पर्यंत हे मंदिर बंद राहणार आहे. या सहा दिवसांमध्ये अनुष्ठानादरम्यान फक्त पुजारीच मंदिरात प्रवेश करु शकतात. यावेळी ते मंदिरातील साफसफाई आणि डागडुजीचे काम करणार आहेत.
मंदिराच्या प्रशासनाने रविवारी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे दर्शनासाठी येणा-या भाविकांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे.