Tirupati Balaji News: अखेर प्रतीक्षा संपली, जम्मूमध्ये तिरुपती बालाजीचे दर्शन, 8 जून रोजी मंदिर सर्वांसाठी खुले होणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 01:43 PM2023-06-06T13:43:25+5:302023-06-06T13:49:25+5:30
जम्मूमध्ये 'वेंकटरमणा गोविंदा, श्रीनिवासा गोविंदा'चा जयघोष घुमणार; 8 जूनला मंदिराचे दरवाजे उघडणार.
Tirupati Balaji Temple in Jammu News: देशातील लाखो-करोडो लोकांची श्रद्धा असलेले तिरुपती बालाजी मंदिरआंध्र प्रदेशात आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. पण, आता जम्मू-काश्मीरमध्येही तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येणार आहे. जम्मूच्या सिध्रा भागात बांधण्यात आलेल्या सर्वात मोठ्या तिरुपती बालाजी मंदिराचे कपाट(मुख्यद्वार) 8 जून रोजी पहिल्यांदाच सर्वसामान्य लोकांसाठी उघडले जाणार आहे.
आज जम्मूतील तिरुपती बालाजी मंदिरात तीन दिवस चालणारी पुजा सुरू झाली असून, शहरभर मंत्रोच्चारांचा आवाज घुमत आहे. शहरातील प्रत्येक व्यक्ती 8 जूनची आतुरतेने वाट पाहत आहे. परवा हजारो-लाखो लोक जम्मूमध्येच भगवान श्री तिरुपती बालाजीचे दर्शन घेतील. माता वैष्णोदेवी दरबारानंतर जम्मूचे तिरुपती बालाजी मंदिर हे या शहरातील मोठे मंदिर असेल.
तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. आता जम्मूमध्येही भाविकांना तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येणार आहे. जम्मूतील निसर्गरम्य परिसरात बांधलेले बालाजी मंदिर संपूर्ण भारतातील भाविकांना आकर्षनाचे स्थान असेल. यामुळे जम्मूमधील धार्मिक पर्यटनाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. तिरुपती बालाजी मंदिर वैष्णोदेवी मंदिर आणि अमरनाथ यात्रेसारख्या प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळांशी जोडले जाईल.
8 जून रोजी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा तिरुपती बालाजी मंदिराचे उद्घाटन करतील. त्यानंतर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातील. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे अध्यक्ष वाय व्ही सुब्बा रेड्डी हेदेखील इतर पुजारी आणि मंडळ सदस्यांसह यावेळी उपस्थित असतील. तिरुपती बालाजी मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी सर्व पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. यात पार्किंगची जागा, एक ध्यान केंद्र, वेदांच्या शिक्षणासाठी वेद पाठशाळा, निवास आणि शौचालय संकुलचा समावेश आहे.