फक्त ३२० रुपये किलो दराने तूप खरेदी करत होतं TTD; कंपनीने उचलला 'या' गोष्टीचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 12:58 PM2024-09-21T12:58:54+5:302024-09-21T13:00:59+5:30

आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात लाडूंमध्ये तुपाच्या भेसळीचा मुद्दा तापत आहे.

Tirupati Board used to buy ghee at the rate of only 320 rupees per kg | फक्त ३२० रुपये किलो दराने तूप खरेदी करत होतं TTD; कंपनीने उचलला 'या' गोष्टीचा फायदा

फक्त ३२० रुपये किलो दराने तूप खरेदी करत होतं TTD; कंपनीने उचलला 'या' गोष्टीचा फायदा

Tirupati Ladoos : आंध्र प्रदेशातील  जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर झाल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडूंमधील तूप भेसळीचा मुद्दा तापत आहे. लाडू तयार करण्यासाठी वापरलेल्या तुपाची चाचणी केली असता त्यात माशाच्या तेलाचा आणि गोमांस टॅलोचा समावेश असल्याचे आढळून आला. हे तूप खरेदीसाठीचे टेंडर मागील सरकारने मंजूर केले होते. त्यानंतर आता या तुपाबाबत आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे.

तिरुपतीच्या श्री वेंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या लाडूच्या नमुन्यामध्ये कमी दर्जाचे तूप आणि प्राण्यांची चरबी आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली. तुपातील भेसळ ओळखण्यासाठी चाचणी सुविधा नाही याचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराने फायदा घेतल्याचा आरोप तिरुमला तिरुपती देवस्थानमने केला. तर आमच्या उत्पादनांचे नमुने संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे प्रमाणित केले होते असे उत्तर तुपाचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने दिले. आता या तुपाच्या किमतीबाबतही महत्त्वाची बाब समोर आली आहे.

लाडू निर्मीतीसाठी तुपाचा पुरवठा करणाऱ्या एआर डेअरीला केवळ ३२० रुपये किलो दराने कंत्राट देण्यात आले होते. त्यासाठी कर्नाटकच्या नंदिनी तूपाची निविदा रद्द करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर जुलैमध्ये तुपात भेसळ आढळून आली आणि पुन्हा नंदिनी कंपनीला तुपाचा ठेका ४७० रुपये प्रति किलो या दराने देण्यात आला होता. एका अहवालाचा हवाला देत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं की, पूर्वीच्या जगनमोहन रेड्डी सरकारमध्ये बालाजी मंदिरातील प्रसादात तुपाऐवजी फिश ऑईल आणि प्राण्यांची चरबी मिसळली जात होती. तर हे दावे चुकीचे असून नायडू  हे देवाच्या नावावर राजकारण करत असल्याचे जगन मोहन रेड्डी यांनी म्हटलं.

आज तकच्या वृत्तानुसार, तूपाच्या निविदा प्रतीवरुन खरेदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निविदेतील अटींचा भंग करून तूप चाचणीसाठी पाठवण्यात आले नाही. निविदेतील कलम ८० नुसार, पुरवठा केलेल्या तुपाच्या प्रत्येक खेपासाठी एनएबीएल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच कलम ८१ नुसार, तुपाचे नमुने तिरुमला तिरुपती देवस्थानम लॅब चाचणीसाठी पाठवणे बंधनकारक आहे. ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीच्या आधीच्या नमुन्यांमध्ये ही भेसळ कशी आढळून आली नाही, असा प्रश्न आता  उपस्थित केला जात आहे. 

टीटीडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्यामला राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आल्यानंतर तात्काळ पुरवठा बंद केला. पुरवठादारांनी चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा नसल्याचा फायदा घेत ३२० ते ४११ रुपयांपर्यंत तूप पुरवठा केला. शुद्ध गाईच्या तुपाच्या पुरवठ्यासाठी ही किंमत योग्य नसल्याचेही ते म्हणाले.
 

Web Title: Tirupati Board used to buy ghee at the rate of only 320 rupees per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.