तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 04:41 AM2024-09-21T04:41:07+5:302024-09-21T04:42:18+5:30

३२० रुपये किलाे दराने झाला पुरवठा, आता ४७५ रुपये किलाेने हाेते खरेदी

Tirupati ghee is hot! Allegation of adulteration of temple ladoo due to purchase of cheap ghee | तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

अमरावती/तिरूपती : तिरूमला तिरूपती देवस्थानातील लाडू प्रकरणात केंद्रीय आराेग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश सरकारकडे अहवाल मागितला असून, मंदिरातील लाडूप्रसादाची तपासणी करण्यात येणार आहे. देवस्थानकडून लाडू बनविण्यासाठी ३२० रुपये किलाे दराने तूपखरेदी केली जात हाेती. मात्र, जुलै महिन्यातच प्रयाेगशाळेतील तपासणीत या तुपात काही बाह्य घटकांची चरबी वापरल्याचे उघडकीस आले हाेते. त्यावेळी स्वस्त, भेसळयुक्त तुपाचा वापर करण्यात आल्याचा आराेप करण्यात येत आहे. या प्रकरणानंतर आता मंदिराच्या परिसराचे शुद्धीकरण करण्यात येत असल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, ए. आर. डेअरी फुड्सकडून तिरूपती देवस्थान ३२० रुपये किलाे या दराने तूप खरेदी करीत हाेते. मात्र, तुपात भेसळ आणि बाह्य चरबी असल्याचे आढळल्यानंतर या डेअरीला काळ्या यादीत टाकण्यात आले. त्यानंतर कर्नाटकातून ४७५ रुपये प्रतिकिलाे दराने तूपखरेदी हाेत आहे. ज्यावेळी बाजारात सुमारे ५०० रुपये किलाे असा तुपाचा दर हाेता, त्यावेळी गेल्या सरकारने भेसळयुक्त, घाणेरडे तूप विकत घेतल्याचा आराेप मुख्यमंत्री नायडू यांनी केला.

कापराचे प्रमाण वाढले

काहीजणांनी साेशल मीडियावर या प्रकरणी सांगितले की, अलीकडच्या काळात लाडवांना कापराचा खूप जास्त गंध येत हाेता.

प्राण्यांची चरबी वापरल्यामुळे ताे वास लपविण्यासाठी माेठ्या प्रमाणात कापूर वापरल्याकडे अनेकांनी लक्ष वेधले. तसेच लाडू लवकर खराब हाेत आहेत.

यापूर्वी महिनाभरापेक्षा जास्त लाेटूनही काळ लाडू खराब हाेत नव्हते. मात्र, आता तीन दिवसांमध्येच लाडू खराब हाेतात, असे अनेकांनी सांगितले.

चार टॅंकर तूप आढळले हाेते अशुद्ध : टीटीडी

तिरूमाला तिरूपती देवस्थानने (टीटीडी) शुक्रवारी भेसळ प्रतिबंधक उपाययोजनांत असलेल्या त्रुटींचा पुरवठादारांनी गैरफायदा घेतल्याचा आरोप केला. एका खासगी पुरवठादाराच्या टँकरपैकी चार टँकर तूप शुद्ध नसल्याचे लक्षात आल्यावर त्याचे नमुने तत्काळ तपासणीसाठी बाहेर पाठविण्यात आले.

यातील निवडक नमुन्यांत प्राण्यांची चरबी सापडल्याचे देवस्थानचे कार्यकारी अधिकारी जे. शामल राव यांनी म्हटले आहे. या पुरवठादाराला काळ्या यादीत टाकून दंड आकारण्यासह त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आल्याचे राव म्हणाले.

दर्जा घसरला कारण...

देवस्थानला पुरवल्या जाणाऱ्या तुपाची तपासणी करण्यासाठी अंतर्गत प्रयोगशाळा नाही.

तुपाचे नमुने घेतले तरी ते बाहेरील प्रयोगशाळांकडे पाठवले जात होते.

या अहवालांची शहानिशा करणारी यंत्रणा देवस्थानकडे उपलब्ध नव्हती.

तूपखरेदीचे आव्हान

आंध्र प्रदेशचे माजी मुख्य सचिव एल. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, तिरूपती मंदिरात तयार हाेणाऱ्या लाडूंसाठी लागणारे तूप केवळ दरराेज चार हजार लिटर दूधखरेदी करू शकेल, अशीच डेअरी पुरवठा करू शकते. त्यामुळे तूपखरेदीचे नेहमी आव्हान असायचे.

सरकार कमी किमतीत पुरवठा करणाऱ्यांना लिलावात कंत्राट देते. शुद्ध तूप महाग असते. त्यामुळेच पुरवठादार भेसळ करतात आणि म्हणूनच सध्याची परिस्थिती उद्भवल्याचे सुब्रमण्यम म्हणाले.

nवर्ष १४८० मध्ये लाडवाचा उल्लेख मंदिरातील नाेंदीत आढळताे. त्यावेळी या प्रसादाला ‘मनाेहरम’ असे म्हटले जायचे.

n३६ लाख लाडू गेल्या वर्षी

१० दिवसांच्या वैकुंठद्वार दर्शनादरम्यान विकण्यात आले.

सत्य समोर आणा... उच्च न्यायालयात याचिका : लाडूच्या प्रसादात कथितरीत्या प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्यावरून निर्माण झालेला वाद पाहता, यातील सत्य बाहेर यावे म्हणून वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या तत्काळ हस्तक्षेपासाठी ‘लंच मोशन’ याचिका दाखल केली आहे. यावर २५ सप्टेंबरला सुनावणी हाेणार आहे.

 

Web Title: Tirupati ghee is hot! Allegation of adulteration of temple ladoo due to purchase of cheap ghee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.