तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 04:36 PM2024-09-25T16:36:07+5:302024-09-25T16:36:31+5:30

Tirupati Laddu controversy : याप्रकरणी टीटीडीने अधिकृतपणे तक्रार दाखल केली आहे. 

Tirupati Laddu row: TTD files complaint against AR Dairy for adulteration of ghee, probe underway | तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल

तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल

Tirupati Laddu controversy: तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचे उघडकीस आले. मागील राज्य सरकारच्या कार्यकाळात तिरुमला तिरुपती देवस्थानमतर्फे (टीटीडी)  प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडू बनविण्यासाठी निकृष्ट पदार्थ व प्राण्याच्या चरबीचा वापर सुरू केला होता, असा अहवाल गुजरातमधील एका प्रयोगशाळेनं दिला. याबाबत आता राजकारण चांगलेच तापलं आहे. दरम्यान, आता याप्रकरणी टीटीडीने अधिकृतपणे तक्रार दाखल केली आहे. 

टीटीडीचे महाव्यवस्थापक पी मुरली कृष्णा यांनी एआर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेड, दिंडीगुल विरुद्ध पूर्व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी, सरकारने पोलीस अधिकारी उत्तम त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन केली आहे. जी लाडू भेसळ प्रकरणाची चौकशी करेल. याचबरोबर, एक दिवस आधी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने (FSSAI) तामिळनाडू येथील आर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेडला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तिरुमला मंदिराचा प्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपाच्या चार नमुन्यांमध्ये प्राण्यांची चरबी आढळून आल्याचा आरोप आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने एआर डेअरी फूड प्रायव्हेट लिमिटेडला नोटीस पाठवली असून खाद्य सुरक्षा आणि मानक (फूड प्रोडक्ट्स स्टँडर्ड्स अँड फूड ॲडिटीव्ह) नियमन २०११ च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीचा केंद्रीय परवाना का निलंबित केला जाऊ नये, अशी विचारणा केली आहे. केंद्रीय प्रयोगशाळेत तुपाच्या नमुन्यांचे विश्लेषण करताना ते मानकांशी जुळत नसल्याचे प्राधिकरणने म्हटले आहे. दरम्यान, टीटीडीच्या तूप खरेदी समितीने पुरवठा केलेले सर्व नमुने गुजरातमधील आणंद येथील एनडीडीबी कॅल्फ लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणला असे आढळले की तूप मानकांची पूर्तता करत नाही.

मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानंतर वाद 
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी अलीकडेच दावा केला होता की, मागील वायएसआरसीपी सरकारच्या काळात तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी निकृष्ट पदार्थ व प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला होता. तसेच, या दाव्यांची चौकशी करण्यासाठी एन. चंद्राबाबू नायडू यांनी विशेष तपास पथकाची घोषणा केली आहे. दरम्यान, या लाडूच्या वादानंतर आता सोमवारी (२३ सप्टेंबर) तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले. या पूजेवेळी मंत्रोच्चाराद्वारे भगवान व्यंकटेश्वर स्वामींची क्षमा मागण्यात आली. टीटीडीने या महाशांती होममचे आयोजन केले होते. 
 

Web Title: Tirupati Laddu row: TTD files complaint against AR Dairy for adulteration of ghee, probe underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.