'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 09:25 PM2024-09-20T21:25:52+5:302024-09-20T21:26:48+5:30
Tirupati Prasadam Controversy : पवन कल्याण यांनी देशात 'सनातन' राष्ट्रीय मंडळाची स्थापना करण्याची मागणी केली.
Tirupati Prasadam Controversy : आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादावरुन राज्यासह देशात मोठा वाद (Tirupati Prasadam Controversy) निर्माण झाला आहे. या प्रसादात जणावरांची चरबी मिसळल्याचा आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी केला आहे. दरम्यान, आता या घटनेवर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी शुक्रवारी (20 सप्टेंबर) मोठे विधान केले.
#WATCH | Amaravati: On Tirupati Laddu Prasadam row, Andhra Pradesh Deputy CM Pawan Kalyan says, "...The quality of prasad is always quite superior and if you get even a small byte, it is like a mahaprasad to everybody. It was done with great reverence. The material chosen for… pic.twitter.com/PFmCa2KRih
— ANI (@ANI) September 20, 2024
पवन कल्याण म्हणाले की, 'जेव्हा मंदिरांवर हल्ले होत असतात, तेव्हा आवाज उठवणे ही प्रत्येक राजकीय नेत्याची मूलभूत जबाबदारी आहे. नेता कोणत्याही धर्माचा असो, त्याने अशा घटनांबाबत आपली जागृकता दाखवली पाहिजे. देशाच्या अखंडतेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष केले जाऊ नये. अनेक दिवसांपासून हा प्रश्न दुर्लक्षित आहे. अशा गोष्टी संपवण्याची वेळ आली आहे. मशीद, चर्च किंवा मंदिर, प्रत्येक प्रार्थनास्थळाचे पावित्र्य आपण राखले पाहिजे. अशा घटना कमी करण्यासाठी आम्ही लवकरच मार्ग शोधू,' असे ते म्हणाले.
एकत्र येण्याचे आवाहन
पवन कल्याण यांनी यापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत देशात 'सनातन' राष्ट्रीय मंडळाची स्थापना करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, सर्व धोरणकर्ते, धार्मिक प्रमुख, न्यायव्यवस्था, सामान्य नागरिक, मीडिया आणि आपापल्या क्षेत्रातील इतर सर्व दिग्गजांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर अर्थपूर्ण चर्चा व्हायला हवी. माझा विश्वास आहे की, ‘सनातन धर्माचा’ कोणत्याही स्वरूपात होणारा अपमान थांबवण्यासाठी आपण सर्वांनी विलंब न लावता एकत्र आले पाहिजे.
जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया
वायएसआरसीपीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी स्वतः पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे. भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिणार आहे. चंद्राबाबू नायडू यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास कसा केला आणि तसे केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का करू नये, हे त्यांना समजावून सांगणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू अशी व्यक्ती आहे की, जी राजकीय फायद्यासाठी देवाचा वापर करू शकते. चंद्राबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेशातील 100 दिवसांच्या कारकिर्दीवरून लक्ष हटवण्यासाठी तूप भेसळीचे आरोप करण्यात आल्याचा प्रतिदावा जगन मोहन रेड्डी यांनी केला.
चंद्राबाबू नायडूंचा हल्लाबोल
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले होते की, गेल्या 5 वर्षांत जगन मोहन सरकार, वायएसआरसीपीच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदाल यांनी या प्रकरणी जगन मोहन रेड्डी, कंत्राटदार आणि टीटीडी अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केली आहे. प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप मिसळून त्यांनी लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळ केला असल्याचे त्यात म्हटले आहे. केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याप्रकरणी सविस्तर अहवाल मागवला आहे.