"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 04:24 PM2024-09-23T16:24:00+5:302024-09-23T16:24:34+5:30
Tirupati laddu controversy : लाडूच्या वादानंतर आता सोमवारी (२३ सप्टेंबर) तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले.
Tirupati laddu controversy :तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. मागील राज्य सरकारच्या कार्यकाळात तिरुपती बालाजी देवस्थानतर्फे प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडू बनविण्यासाठी निकृष्ट पदार्थ व प्राण्याच्या चरबीचा वापर केला होता, असा अहवाल गुजरातमधील एका प्रयोगशाळेनं दिला. यावरून अनेकांनी संताप व्यक्त केला असून देशातील राजकारण चांगलेच तापलं आहे.
दरम्यान, लाडूच्या वादानंतर आता सोमवारी (२३ सप्टेंबर) तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण करण्यात आले. या पूजेवेळी मंत्रोच्चाराद्वारे भगवान व्यंकटेश्वर स्वामींची क्षमा मागण्यात आली. तिरुमला तिरुपती देवस्थानम् (टीटीडी) ने या महाशांती होममचे आयोजन केले होते. मंदिराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ४ तास हा शुद्धीकरण कार्यक्रम चालला. या कार्यक्रमात मंदिराच्या पुजाऱ्यांसह टीटीडीचे अधिकारीही सहभागी झाले होते. यानंतर तिरुपतीच्या प्रसिद्ध 'लाडू प्रसादम्'ला पुन्हा पावित्र्य बहाल करण्यात आल्याचेही टीटीडीने म्हटले आहे.
याबाबत मंदिराच्या एका पुजाऱ्याने भाष्य केले आहे. ते म्हणाले, हे सांगणे अत्यंत दुर्दैवी आहे की, गेल्या ४-५ दिवसांपासून बालाजीचा प्रसाद तूप वापरून तयार केला जात असल्याच्या अनेक बातम्या जगभरात पसरत आहेत. त्यात प्राण्यांची चरबी असते. तसेच, काही प्रयोगशाळेच्या अहवालावरून तुपात काही प्रमाणात भेसळ असल्याचे सरकारने सिद्ध केले आहे. त्यामुळे मंदिराच्या ठिकाणांचे शुद्धीकरण करण्यासाठी काय करावे यासाठी सरकारने प्रस्ताव आणला, असे मंदिराच्या ज्येष्ठ पुजाऱ्यांपैकी एक कृष्ण शेषचला दीक्षितुलु यांनी सांगितले.
"आता सर्व काही शुद्ध झालंय"
आम्ही शांती होम करण्याचा प्रस्ताव घेऊन व्यवस्थापनाकडे गेलो. मंजुरी मिळाल्यावर काल संध्याकाळी ६ नंतर करायचं ठरवलं. सकाळी ६ नंतर आम्ही सर्वजण भगवान व्यंकटेश्वराचे आशीर्वाद आणि परवानगी घेण्यासाठी गर्भगृहात गेलो. आता सर्व काही शुद्ध झाले आहे, मी सर्व भक्तांना विनंती करतो की, आता काळजी करण्याची गरज नाही. भगवान बालाजीचे दर्शन घ्या आणि प्रसाद घरी घेऊन जा, असे कृष्ण शेषचला दीक्षितुलु यांनी सांगितले.
#WATCH | Andhra Pradesh | A 'purification' ritual, Shanti Homam was performed as per the tenets of Vaikhanasa Agama in the Yagashala of Tirumala temple today in wake of Laddu Prasadam row. pic.twitter.com/9atHj7mXqD
— ANI (@ANI) September 23, 2024
लाडू वादावर मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
तिरुपती तिरुमला मंदिरात शांती होम, शुद्धीकरण आणि विधी करण्याचा उद्देश देखील प्रायश्चित आणि चूक सुधारण्यासाठी होता. दरम्यान, लाडू वादावर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे वक्तव्यही समोर आले होते. ते म्हणाले, मंदिरात भेसळयुक्त तूप पुरवणाऱ्यांना राज्य सरकार सोडणार नाही. यासोबतच काही दोषी कर्मचाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी (२२ सप्टेंबर) मंदिराच्या पावित्र्याचे उल्लंघन केल्याबद्दल मागील वायएसआरसीपी सरकारवर निशाणा साधला. टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आरोप केला की, मागील जगन मोहन रेड्डी सरकारच्या काळात टीटीडीने तूप खरेदी करण्याच्या प्रक्रियेत बदल केला होता. सीएम नायडू यांनीही या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे.