टी.एम. कृष्णा, बिझवाडा विल्सन यांना ‘रेमन मॅगसेसे’ पुरस्कार
By admin | Published: July 28, 2016 04:30 AM2016-07-28T04:30:04+5:302016-07-28T04:30:04+5:30
कर्नाटकी गायक तोडूर मुदाबिसी कृष्णा (४०) आणि हाताने मैला उचलण्याच्या प्रथेच्या निर्मूलनासाठी अथक प्रयत्न करणारे बिझवाडा विल्सन (५०) या दोन भारतीयांना २०१६
मनिला : कर्नाटकी गायक तोडूर मुदाबिसी कृष्णा (४०) आणि हाताने मैला उचलण्याच्या प्रथेच्या निर्मूलनासाठी अथक प्रयत्न करणारे बिझवाडा विल्सन (५०) या दोन भारतीयांना २०१६ या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा ‘रेमन मॅगसेसे’ पुरस्कार बुधवारी जाहीर झाला. आणखी चार जणदेखील या पुरस्काराचे मानकरी जाहीर झाले आहेत.
बिझवाडा विल्सन हे सफाई कर्मचारी आंदोलनचे (एसकेए) राष्ट्रीय निमंत्रक असून, त्यांनी प्रतिष्ठेचे मानवी आयुष्य हा हिरावता न येणारा हक्क असल्याचे ठामपणे सांगितले, तर कृष्णा हे संस्कृतीमध्ये सामाजिक समाविष्टता वाढविणारे उदयोन्मुख नेतृत्व आहे, अशा शब्दांत त्यांचा बहुमान करण्यात आला आहे.
संगीत हे वैयक्तिक आणि समाजात खरोखर खूप खोलवर बदल करणारी शक्ती असल्याचे कृष्णा यांनी दाखवून दिले, अशा शब्दांत त्यांचा गौरव करण्यात आला आहे. कृष्णा यांचा जन्म चेन्नईत ब्राह्मण कुटुंबात झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांचे कर्नाटक संगीतातील दिग्गजांकडे प्रशिक्षण झाले. विल्सन यांचा जन्म दलित कुटुंबात झाला व त्यांचे कुटुंब कर्नाटकातील कोलार येथील सोन्याच्या खाण परिसरात हाताने
मैला साफ करण्याचे काम करायचे. कुटुंबात उच्चशिक्षण घेणारे विल्सन हे पहिलेच आहेत. भारतात हाताने मैला साफ करणे हा मानवतेला लागलेला रोग आहे. त्यांनी हातांनी मानवी विष्ठा उचलण्याच्या प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी लढायचे ठरवले होते. (वृत्तसंस्था)
हाताने मैला उचलण्याच्या प्रथेच्या निर्मूलनासाठीचा विल्सन यांचा लढा ३२ वर्षांपासून सुरू आहे. १९५७ मध्ये हा पुरस्कार देण्यास प्रारंभ झाला. अशियातील हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. दर वर्षी हा पुरस्कार अशियात व्यक्तीला किंवा संस्थेला नि:स्वार्थ सेवेबद्दल आणि सकारात्मक बदलांसाठी दिला जातो.
इतर मान्यवर
पुरस्कारप्राप्त इतर मान्यवरांमध्ये कोनचिता कॅरपियो- मोराल्स (फिलिपाइन्स), डोमपेट धुअफा (इंडोनेशिया), जपान ओव्हरसीज कार्पोरेशन व्हॉलिंटियर्स आणि व्हेंटियन्स रिस्क्यू (लाओस) यांचा समावेश आहे.