पश्चिम बंगालमध्ये TMC-BJP निवडणूक मॅचमध्ये आजी-माजी क्रिकेटर मैदानात भिडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 09:21 AM2024-03-11T09:21:46+5:302024-03-11T09:22:40+5:30
युसुफ पठाण काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात आहेत.
नवी दिल्ली - आगामी लोकसभेचे बिगुल काही दिवसांत वाजणार आहे. तत्पूर्वी सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपा, काँग्रेसनंतर आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनेही राज्यातील ४२ जागांसाठी उमेदवारी जाहीर केलेत. त्यात भारताचे माजी क्रिकेटर युसुफ पठाण आणि किर्ती आझाद यांच्या नावाचाही समावेश आहे. युसुफ पठाण बहरामपूरमधून तर किर्ती आझाद यांना बर्धमान दुर्गापूर जागेवरून तिकीट देण्यात आलं आहे.
युसुफ पठाण काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात आहेत. युसूफ २००७ मध्ये वर्ल्डकप आणि २०११ मध्ये वन डे वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय टीमचा हिस्सा होता. तर किर्ती आझाद १९८३ मध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीममध्ये होते. युसुफ भारतातील एक माजी ऑल राऊंडर इरफान पठाण यांचा भाऊ आहे. तो आयपीएलच्या कोलकाता नाइट रायडर्सकडून ७ वर्ष क्रिकेट खेळला आहे. आयपीएलमध्ये २०१२ आणि २०१४ चा खिताब जिंकल्यानंतर तो पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात आला होता.
भाजपाकडून मोहम्मद शमी नाव चर्चेत
मोहम्मद शमी हे नाव सर्वांच्या परिचयाचं आहे. टीम इंडियातील वेगवान गोलंदाज शमीनं त्याच्या शानदार खेळीमुळे वर्ल्डकपमध्ये नावलौकीक मिळवला. सध्या शमीने सर्जरीमुळे ब्रेक घेतलाय परंतु त्यात शमीचं नाव वेगळ्याच कारणासाठी पुढे आलंय. येत्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपाकडून मोहम्मद शमी निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात असं बोलले जाते.
मोहम्मद शमी याने त्याच्या क्रिकेटची सुरुवात बंगालकडून केली होती. बंगालच्या रणजी ट्रॉफीत शमीने मोठं योगदान दिले. शमी आजही बंगालसाठी क्रिकेट खेळतो. त्यामुळे भाजपा नेतृत्वाकडून बंगालच्या राजकीय मैदानात शमीला उतरवण्याचे जोरदार प्रयत्न आहेत. भाजपानं शमीला ऑफरही दिली आहे. सूत्रांनुसार, शमी बंगालच्या बशीरहाट जागेवरून निवडणूक लढवू शकतो. शमीसोबत भाजपाची चर्चा सकारात्मक सुरू आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या TMC-BJP यांच्या राजकीय मॅचमध्ये आजी-माजी क्रिकेटर मैदानात भिडणार असल्याचं दिसून येते.