शहाजहान शेख यांना आणखी एक धक्का; ममता बॅनर्जींनी ६ वर्षांसाठी पक्षातून केली हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 04:58 PM2024-02-29T16:58:06+5:302024-02-29T17:11:15+5:30
शेख शाहजहान यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) शेख शाहजहान यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. टीएमसीचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी शाहजहानला अटक केल्यानंतर लगेचच पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला.
ओब्रायन म्हणाले की, 'आम्ही शेख शाहजहान यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. नेहमीप्रमाणे, आम्ही जे बोलतो ते करतो. आम्ही भाजपाला आव्हान देतो की, ज्या नेत्यांवर भ्रष्टाचारासह अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांना निलंबित करावे, असं आव्हान देखील ओब्रायन यांनी दिले.
#WATCH | TMC leader Derek O'Brien in Kolkata announces, "TMC has decided to suspend Sheikh Shahjahan from the party for six years." pic.twitter.com/AYq3wtktBR
— ANI (@ANI) February 29, 2024
गेल्या काही दिवसापूर्वी बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. संदेशखळी येथील अनेक महिलांचा छळ केल्याचा आरोप शहाजहान यांच्यावर आहे. याशिवाय अनेकांनी जमीन बळकावल्याचाही आरोप आहे. आज शहाजहान शेख यांना अटक करण्यात आली. शहाजहान शेख हे स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहेत. पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी या सीमावर्ती भागात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसशी संबंधित शहाजहान शेख हे एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून ओळख होती.
दरम्यान, काही दिवसापूर्वी त्यांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रेशन घोटाळ्याप्रकरणी छापा टाकला होता, त्यावेळी समर्थकांनी ईडी आणि सीएपीएफ कर्मचाऱ्यांवर हल्ला केला होता. उत्तर २४ परगणा जिल्ह्यात जमीन हडप आणि स्थानिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांवरून शाहजहान शेख आणि त्याच्या समर्थकांविरोधात निदर्शने सुरू आहेत. गेल्या महिन्यात, कथित रेशन घोटाळ्याच्या संदर्भात त्याच्या घरावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर जमावाने हल्ला केल्यानंतर शाहजहान शेख फरार झाले होते.