ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 11:02 AM2024-11-07T11:02:11+5:302024-11-07T11:03:22+5:30
तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या ३७व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मोठे संकेत दिले आहेत.
Abhishek Banerjee : पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय चर्चांना वेग आला आहे. मु्ख्यमंत्री ममता बॅनर्जी या आता मार्गदर्शक म्हणून आपली भूमिका पार पाडणार आहेत का? त्यांना पुढच्या पिढीकडे राजकारण सोपवायचे आहे का? असे प्रश्न सध्या कोलकात्यापासून दिल्लीपर्यंतच्या लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. याचे कारण म्हणजे, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या ३७व्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मोठे संकेत दिले आहेत.
डायमंड हार्बरचे खासदार पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात, असे विधान राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार कुणाल घोष यांनी केले आहे. दरम्यान, कुणाल घोष यांच्या या विधानावर विरोधी पक्षांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. सत्ताधारी पक्ष घराणेशाहीचे राजकारण करत असल्याचा आरोप होत आहे.दरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कुणाल घोष यांनी त्यांना चांगले आरोग्य, विशेषत: त्याच्या डोळ्यांशी संबंधित समस्या बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, अभिषेक बॅनर्जी यांच्या पक्षातील योगदानाचेही कुणाल घोष यांनी कौतुक केले.
कुणाल घोष यांनी फेसबुकवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की," अभिषेक बॅनर्जी यांनी अगदी लहान वयातच आपली नेतृत्व क्षमता सिद्ध केली आहे. मी राजकारणात सक्रीय राहो की नाही, या उगवत्या ताऱ्याला मी जवळून पाहीन. अभिषेक तरुण आहेत, पण जोपर्यंत मी टीएमसीमध्ये सक्रिय आहे, तोपर्यंत ते माझे नेता आहेत. राजकारणापलीकडेही मला त्यांच्याबद्दल आपुलकी आणि आदर आहे. मी ममता बॅनर्जी यांना वर्षानुवर्षे नेतृत्व करताना पाहिले आहे, आणि आता मी अभिषेक यांना उदयास येताना पाहत आहे."
कुणाल घोष पुढे म्हणाले की, "अभिषेक बॅनर्जी काळानुसार अधिक परिपक्व होत आहेत, आधुनिक पद्धती आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ करत आहेत, आपल्या कौशल्यात अधिक सुधारणा करत आहेत. अभिषेक हे एक दिवस पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री होतील आणि तृणमूल काँग्रेसला एका नव्या युगात घेऊन जातील. ते ममता बॅनर्जींच्या भावना आणि वारशाचे प्रतीक आहेत." दरम्यान, अभिषेक बॅनर्जी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत. त्यामुळे कुणाल घोष यांच्या दाव्यावरून कुठलाही निष्कर्ष काढणे योग्य नसले तरी सध्या राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे.
भाजप, माकपाकडून टीका
कुणाल घोष यांच्या विधानावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य म्हणाले, 'तृणमूल काँग्रेस हा लोकांचा पक्ष नाही, तो एक कौटुंबिक व्यवसाय आहे. ते वारसा म्हणून मुख्यमंत्रिपद सोपवण्याच्या तयारीत आहेत. पश्चिम बंगालमधील लोक अशा घराणेशाहीला कंटाळले आहेत आणि खरे प्रतिनिधित्व शोधत आहेत. दुसरीकडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) नेते सुजन चक्रवर्ती यांनीही टीएमसीवर कुटुंबातील सदस्यांना प्राधान्य देण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.