Mamata Banerjee: “भाजप सरकारला सत्तेबाहेर काढण्याची ताकद ‘या’ एकाच पक्षात”; ममता बॅनर्जींनी थेट नाव घेतले!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 09:01 PM2023-02-08T21:01:25+5:302023-02-08T21:02:11+5:30
Mamata Banerjee: जो पक्ष लोकांना १०० दिवस काम देऊ शकत नाही, त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.
Mamata Banerjee: देशात कुठे ना कुठे निवडणुकांचे वारे वाहत असतात. अलीकडेच झालेल्या काही राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर आता ईशान्य भारतातील त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला पराभवाची चव चाखायला लावणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपवर जोरदार निशाणा साधला.
भाजपसह काँग्रेस आणि अन्य स्थानिक पक्षांनी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर वाढवला आहे. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसही त्रिपुरा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. टीएमसीच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्रिपुरात दाखल झाल्या. ममता बॅनर्जी यांनी एका प्रचारसभेत बोलताना भाजपवर हल्लाबोल केला.
भाजप सरकारला सत्तेबाहेर काढण्याची ताकद एकाच पक्षात
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष हा असा देशातील एकमेव पक्ष आहे, जो भाजपच्या डबल इंजिन सरकारला सत्तेतून बाहेर काढू शकतो. देशातील नागरिकांना भाजपऐवजी उत्तम पर्याय देऊ शकतो. भाजपच्या काळात त्रिपुरामध्ये लोकशाहीची पायमल्ली झाली. राज्यात पक्षांच्या राजकीय बैठकांना परवानगी नाकारली जात आहे. पत्रकारांनी बातम्या गोळा करण्याचा अधिकार गमावला आहे. डबल इंजिनवाले सरकार असताना देशात बेरोजगारी ४० टक्क्यांनी वाढली. भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली का? तुमच्या बँक खात्यात १५ लाख रुपये आले का? जो पक्ष लोकांना १०० दिवस काम देऊ शकत नाही त्या पक्षाला लोकांची मते मागण्याचा अधिकार नाही, या शब्दांत ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला.
दरम्यान, २ वर्षांपूर्वी आमच्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांवर हल्ला केला गेला. त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात डांबण्यात आले. येथे लोकशाही पायदळी तुडवली जात आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"