संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 06:38 PM2024-05-12T18:38:20+5:302024-05-12T18:39:35+5:30
Lok Sabha Election 2024 : टीएमसीने आपल्या तक्रारीत संदेशखळीच्या महिलांविरुद्ध खोटेपणा, फसवणूक, गुन्हेगारी धमकी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला आहे.
Sandeshkhali sting video row : लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमधील संदेशखळीच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. संदेशखळीच्या स्टिंग ऑपरेशनचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) राष्ट्रीय महिला आयोगाच्या (एनसीडब्ल्यू) अध्यक्षा रेखा शर्मा आणि स्थानिक भाजपा नेत्यांविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून फौजदारी कारवाईची मागणी केली.
टीएमसीने आपल्या तक्रारीत संदेशखळीच्या महिलांविरुद्ध खोटेपणा, फसवणूक, गुन्हेगारी धमकी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला आहे. टीएमसीने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, "बलात्काराची खोटी तक्रार नोंदवण्यासाठी आणि कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेण्यासाठी दबाव आणण्याचे हे कृत्य केवळ कायदा आणि अधिकारांचा गैरवापरच नाही, तर खोटेगिरी आणि फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांसारखे आहे."
याप्रकरणी टीएमसीने एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा, प्रियाली दास आणि इतर भाजपा नेत्यांवर निवडणूक आयोगाकडे फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. तसेच, साक्षीदारांना आणखी धमकावणे आणि खोट्या आरोपांचा प्रसार रोखण्यासाठी सूचना जारी करण्याची मागणी टीएमसीने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
महिलांना आपल्या तक्रारी मागे घेण्यास भाग पाडण्यात आल्याचा दावा एनसीडब्ल्यूने केला असून या प्रकरणाची निवडणूक आयोगाने सुद्धा चौकशी करावी, अशी मागणी केली. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात, एनसीडब्ल्यूने म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये टीएमसी सत्ताधारी पक्ष असल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांकडून संदेशखळीच्या महिलांना त्यांच्या तक्रारी मागे घेण्यास भाग पाडले जात आहे.
दरम्यान, टीएमसीने शुक्रवारी (१० मे) एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. तसेच, टीएमसीच्या म्हणण्यानुसार, अनेक महिलांनी आरोप केला आहे की, भाजपा नेत्यांनी त्यांची फसवणूक करून टीएमसीच्या नेत्यांविरोधात लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या आहेत.