Mahua Moitra : "Apple कडून वॉर्निंग मेसेज आला, सरकार माझा फोन हॅक करतंय"; महुआ मोइत्रांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 10:33 AM2023-10-31T10:33:25+5:302023-10-31T10:38:54+5:30
Mahua Moitra : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात सापडलेल्या टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
कॅश फॉर क्वेरी प्रकरणात सापडलेल्या टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकार आपला फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महुआ यांनी सांगितले की, मला Apple कडून अलर्ट आणि ईमेल मिळाला की सरकार माझा फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे.
गृहमंत्रालयाला टॅग करत महुआ यांनी पुढे लिहिलं आहे की, "अदानी आणि पीएमओचे लोक, जे मला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, तुमच्या भीतीमुळे मला तुमची दया येते. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी, मला आणि इंडिया आघाडीच्या इतर तीन नेत्यांना आतापर्यंत असे अलर्ट मिळाले आहेत."
Received text & email from Apple warning me Govt trying to hack into my phone & email. @HMOIndia - get a life. Adani & PMO bullies - your fear makes me pity you. @priyankac19 - you, I , & 3 other INDIAns have got it so far . pic.twitter.com/2dPgv14xC0
— Mahua Moitra (@MahuaMoitra) October 31, 2023
नेमकं काय प्रकरण आहे?
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी एका व्यावसायिकाकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता. महुआ मोइत्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली होती. यानंतर ओम बिर्ला यांनी हे प्रकरण संसदेच्या एथिक्स कमिटीकडे पाठवले होते.
जय अनंत देहाद्राई यांच्याकडून मिळालेल्या पत्राचा हवाला देत निशिकांत यांनी मोईत्रा यांच्यावर हे आरोप केले आहेत. निशिकांत दुबे यांचा दावा आहे की, महुआ मोइत्रा यांनी नुकत्याच लोकसभेत विचारलेल्या 61 प्रश्नांपैकी 50 प्रश्न अदानी प्रकरणावर केंद्रित होते. त्याचवेळी मोईत्रा यांनी या संपूर्ण वादासाठी निशिकांत दुबे आणि त्यांचा मित्र जय अनंत यांना जबाबदार धरले.
17 ऑक्टोबर रोजी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आरोप केले की, त्यांच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्यासाठी हे आरोप करण्यात आले आहेत. महुआ मोइत्रा यांच्या याचिकेत न्यायालयाने दुबे, देहाद्राई आणि अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मीडिया हाऊसना त्यांच्या विरोधात कोणतीही खोटी आणि बदनामीकारक माहिती पोस्ट, प्रसारित करण्यापासून रोखण्यासाठी निर्देश जारी करावेत अशी मागणी केली आहे. मात्र महुआ यांच्या वकिलांनी या खटल्यातून माघार घेतली.