संसदेच्या आचार समितीने महुआ मोईत्रांना पाठवले समन्स; 'या' दिवशी हजर राहण्याचे दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 04:20 PM2023-10-26T16:20:33+5:302023-10-26T16:21:52+5:30
तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपासंदर्भात संसदेच्या आचार समितीची गुरुवारी पहिली बैठक झाली.
नवी दिल्ली : पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, संसदेच्या आचार समितीने महुआ मोईत्रा यांना ३१ ऑक्टोबरला हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे. महुआ मोईत्रा यांना ३१ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता समितीसमोर हजर राहायचे आहे.
या प्रकरणात भाजपचे खासदार आणि तक्रारकर्ते निशिकांत दुबे यांनीही आचार समितीच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी भविष्यातही पूर्ण सहकार्य करण्याबाबत सांगितले. यादरम्यान, निशिकांत दुबे यांना त्यांच्या पदवीबाबतही प्रश्न विचारण्यात आले, यावरही त्यांनी उत्तर दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निशिकांत दुबे यांनी सांगितले की, कोर्टात हे प्रकरण निकाली काढण्यात आले आहे. तसेच, आता काही लोक रस्त्यावर उभे राहून आरोप करत आहेत, असे निशाकांत दुबे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपासंदर्भात संसदेच्या आचार समितीची गुरुवारी पहिली बैठक झाली. त्यात भाजपचे खासदार आणि तक्रारकर्ते निशिकांत दुबे आणि वकील जय अनंत डेहडराई यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केलेल्या तक्रारीत अनंत देहादराई यांनी शेअर केलेल्या कागदपत्रांचा संदर्भ दिला आहे. हे प्रकरण ओम बिर्ला यांनी भाजप खासदार विनोद कुमार सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील आचार समितीकडे पाठवले आहे.
काय आहे प्रकरण?
निशिकांत दुबे यांनी गेल्या आठवड्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. तसेच, लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला. यानंतर दर्शन हिरानंदानी यांनी मोठा खुलासा केला. उद्योगपती गौतम अदानींबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांचा वापर केल्याचे स्वतः दर्शन हिरानंदानी यांनी कबूल केले. केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी महुआ मोईत्रा यांच्या संसदीय लॉगिनचा वापर केल्याचेही दर्शन हिरानंदानी यांनी सांगितले. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे, महुआ मोईत्रा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि लोकसभेच्या आचार समितीच्या 'प्रश्नांची उत्तरे' देण्यास तयार आहे, असे महुआ मोईत्रा यांनी सांगितले आहे.