"महुआ मोईत्रा यांनी पैसे घेऊन संसदेत विचारले प्रश्न", निशिकांत दुबे यांची सभापतींकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 10:24 PM2023-10-15T22:24:08+5:302023-10-15T22:25:11+5:30
महुआ मोईत्रा यांनी संसदेत एकूण ६१ पैकी ५० प्रश्न विचारले, जे सुरक्षेशी संबंधित होते, असे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सांगितले.
नवी दिल्ली : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा सभापतींना पत्र लिहून तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. मुंबईतील एका व्यावसायिकाच्या विनंतीवरून महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारल्याचे निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. तसेच, यासाठी महुआ मोईत्रा यांना रोख रक्कम आणि भेटवस्तू घेतल्या असून यासंदर्भात वकील जय अनंत देहाद्राई यांनीही आपल्याला पुरावे दिले आहेत, असे निशिकांत दुबे यांनी दावा केला आहे.
महुआ मोईत्रा यांनी संसदेत एकूण ६१ पैकी ५० प्रश्न विचारले, जे सुरक्षेशी संबंधित होते, असे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सांगितले. तसेच, ही बाब अत्यंत गंभीर आहे. जे पैशाच्या बदल्यात संसदेत प्रश्न विचारण्याशी संबंधित १२ डिसेंबर २००५ च्या 'कॅश फॉर क्वेरी' एपिसोडची आठवण करून देते. यामध्ये ११ खासदारांचे सदस्यत्व गमवावे लागले होते, असे निशिकांत दुबे म्हटले आहे.
याचबरोबर, निशिकांत दुबे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, जेव्हाही सभागृहाचे अधिवेशन सुरू होते, तेव्हा महुआ मोईत्रा आणि सौगत रॉय नेहमी सभागृहात गोंधळ घालत असत. सरकारला जनहिताचे प्रश्न उपस्थित करण्यापासून रोखणे हा त्यामागचा हेतू होता. आता प्रश्नांच्या बदल्यात पैसे आणि भेटवस्तू घेतल्याचे पुरावे आले आहेत, त्यामुळे महुआ मोईत्रा यांचा पर्दाफाश झाला आहे
याप्रकरणी सभापतींनी चौकशी समिती स्थापन करावी, अशी मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे. जोपर्यंत समितीचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत महुआ मोईत्रा यांना लोकसभेच्या सदस्यत्वावरून निलंबित करण्यात यावे, असेही निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. सभापतींना पाठवलेल्या पत्रासोबत त्यांनी तक्रारदाराचे पत्रही दिले आहे.
दरम्यान, या प्रकरणी महुआ मोईत्रा यांनी हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतले आहेत का? हे जाणून घ्यायचे आहे. याची चौकशी झाली पाहिजे. सिद्ध झाल्यास त्यांना खासदारपदावरून बडतर्फ करण्यात यावे, असे पश्चिम बंगाल भाजपचे सरचिटणीस आणि आमदार अग्निमित्रा पॉल यांनी निशिकांत दुबे यांच्या आरोपांवर म्हटले आहे.