TMC खासदार नुसरत जहाँ यांची ईडीकडून चौकशी, फ्लॅट विक्रीत करोडोंच्या फसवणुकीचे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 12:43 PM2023-09-12T12:43:06+5:302023-09-12T12:44:52+5:30
आज नुसरत जहाँ ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.
कोलकता : तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ मंगळवारी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. सकाळी दहा वाजताच्या सुमारास सॉल्ट लेकमधील सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये नुसरत जहाँ पोहोचल्या आहेत. फ्लॅट देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने नुसरत जहाँ यांची चौकशी सुरू केली. दरम्यान, याप्रकरणी गेल्या आठवड्यात नुसरत जहाँ यांना ईडीने नोटीस बजावली आणि पुढील आठवड्यात (ता. १२) चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, आज नुसरत जहाँ ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.
फ्लॅट देण्याच्या नावाखाली ५०० जणांकडून पैसे घेतले, मात्र बराच वेळ होऊनही फ्लॅट दिला गेला नाही, असा आरोप नुसरत जहाँ यांच्यावर आहे. दरम्यान, सेव्हन सेन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने गुंतवणुकदारांना, ज्येष्ठ नागरिकांना चार वर्षात वाजवी किमतीत फ्लॅट देण्याची हमी दिली होती. यानुसार कोट्यवधी रुपये गोळा केले होते. मात्र त्यांना अद्याप फ्लॅट देण्यात आले नाहीत. या कंपनीवर फ्लॅट विक्रीत वीस कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. तर या कंपनीवर नुसरत जहाँ संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे फ्लॅट विकण्याच्या नावाखाली नुसरत जहाँ यांच्यावर अनेक ज्येष्ठांची फसवणूक केल्याचा आरोप होता.
याप्रकरणी भाजप नेते शंकुदेव पांडा, अनेक तक्रारदारांसह गरियाहाट पोलीस स्टेशन आणि सॉल्ट लेक सीजीओ कॉम्प्लेक्स येथील ईडी कार्यालयात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. त्यावेळी फसवणुकीच्या आरोपाखाली गरियाहाट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यानंतर अलीपूर न्यायालयात जाऊन खटला दाखल करण्यात आला होता. त्या तक्रारीच्या आधारे कोलकाता पोलीस आणि ईडीने तपास सुरू केला आहे. ईडीने नुसरत जहाँ समन्स बजावले आणि चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
याचबरोबर, कॉर्पोरेट कंपनी सेव्हन सेन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे आणखी एक संचालक राकेश सिंह यांनाही चौकशीस हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत. या दोघांना कोलकता येथील साल्ट लेक येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, या फसवणूक प्रकरणात बसीरहाटमधील तृणमूल खासदार नुसरत जहाँ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, ईडीच्या तपासात सहकार्य करणार असल्याचे नुसरत जहाँ यांनी सांगितले आहे. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे आमदार तापस रॉय म्हणाले की, याप्रकरणात केवळ नुसरत जहाँ उत्तर देण्यास सक्षम आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून यावर भाष्य करण्यासारखे काही नाही.