Shatrughan Sinha: “२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी गेम चेंजर ठरतील”: शत्रुघ्न सिन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 07:36 PM2022-04-27T19:36:20+5:302022-04-27T19:39:02+5:30
Shatrughan Sinha: आता भाजपमध्ये हुकूमशाही असून, पक्ष केवळ पंतप्रधानांच्या सूचनांचे पालन करतो, अशी टीका शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे.
नवी दिल्ली: लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यामुळे मी खूप प्रभावित झालो आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी मोठ्या गेम चेंजर ठरणार आहेत, असा दावा तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झालेल्या शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी केले आहे. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसवासी झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पश्चिम बंगाल येथे झालेल्या आसनसोल लोकसभा पोटनिवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा प्रचंड मतांनी निवडून आले.
अलीकडेच देशभरातील अनेक ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या. यापैकी आसनसोलमधून लोकसभा पोटनिवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांनी विजय मिळवला. शत्रुघ्न सिन्हा यांनी आसनसोल मतदारसंघातून भाजपच्या अग्निमित्रा पॉल यांचा ३ लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. या जागेवर तृणमूलने यापूर्वी कधीही निवडणूक जिंकली नव्हती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
ममता बॅनर्जींमुळे मी खूप प्रभावित झालो
मित्र राजेश खन्ना यांच्या विरोधात पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. ममता बॅनर्जी अशा नेत्या आहेत ज्यांचा सर्वांना आदर आहे. २०२४ मध्ये त्यांची भूमिका दुर्लक्षित करता येणार नाही. लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ममता बॅनर्जींमुळे मी खूप प्रभावित झालो आहे. सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मी राजकारणात आलो. जयप्रकाश नारायण यांचा माझ्यावर खूप प्रभाव होता, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. भाजपला रामराम करण्याच्या निर्णयावर बोलताना, आता भाजपमध्ये लोकशाही नाही तर हुकूमशाही चालते. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा लोकशाहीवर विश्वास होता. आज भाजपा केवळ पंतप्रधानांच्या सूचनांचे पालन करते, अशी टीका सिन्हा यांनी केली.
दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा हे वाजपेयी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. पहिली निवडणूक लालकृष्ण अडवाणींच्या सांगण्यावरून लढलो. ते माझे राजकीय गुरू आहेत. पहिली निवडणूक माझा मित्र राजेश खन्ना विरुद्ध लढलो. ते काँग्रेस पक्षाकडून उभे होते. ती पोटनिवडणूक होती. मला ही निवडणूक लढवायची नव्हती पण लालकृष्ण अडवाणींनी तसे करण्यास सांगितले, अशी आठवण शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितली.