ममतांचा भाचा होणार बंगालचा मुख्यमंत्री? TMC खासदाराचं ट्विट; ममतांसंदर्भात केली मोठी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 05:17 PM2022-05-03T17:17:31+5:302022-05-03T17:24:31+5:30
सोमवारी तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ता कुणाल घोष यांनी ट्विट करत, अभिषेक बॅनर्जी 2036 मध्ये बंगालचे मुख्यमंत्री होतील, असे म्हटले होते.
ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी पश्चिम बंगालचा पुढचा मुख्यमंत्री असणार का? टीएमसी खासदार अपरूपा पोद्दार यांच्या एका ट्विटनंतर राजकीय वर्तुळात या चर्चेला सुरुवात झाली आहे. ट्विट करत पोद्दार म्हणाल्या, 2024 मध्ये ममता बॅनर्जी या देशाच्या पंतप्रधान होतील, तर अभिषेक बॅनर्जी हे बंगालचे मुख्यमंत्री होतील.
पोद्दार यांनी ट्विट केले होते, की 'आरएसएसशी संबंधित राष्ट्रपतींकडून 2024 मध्ये ममता बॅनर्जी या पंतप्रधान पदाची शपथ घेतील. याशिवाय अभिषेक बॅनर्जी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होतील. मात्र, पोद्दार यांनी पुढच्या तासाभरातच हे ट्विट डिलीट केले. यासंदर्भात त्यांच्याकडून कसल्याही प्रकारचे उत्तर देण्यात आलेले नाही. यामुळे, हायकमांडच्या आदेशानंतर, त्यांनी हे ट्विट डिलीट केल्याचे मानले जात आहे.
तत्पूर्वी, सोमवारी तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ता कुणाल घोष यांनी ट्विट करत, अभिषेक बॅनर्जी 2036 मध्ये बंगालचे मुख्यमंत्री होतील, असे म्हटले होते. ममता बॅनर्जी सरकारच्या सलग तिसऱ्या टर्मला सोमवारी एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त, कुणाल घोष यांनी हे ट्विट केले होते. ट्विट करत घोष म्हणाले होते, 'तृणमूल काँग्रेसचा एक सैनिक म्हणून मी सांगू शकतो, की ममता बॅनर्जी या 2036 पर्यंत राज्याच्या मुख्यमंत्री राहतील. यानंतर, 2036 मध्ये त्या अभिषेक बॅनर्जी यांच्या शपथविधीला पालक म्हणून उपस्थित राहतील. अभिषेक बॅनर्जी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.'
याशिवाय, ममता बॅनर्जी या दीर्घकाळ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राहतील आणि ज्योती बसू यांचा विक्रम मोडतील. ज्योती बसू हे सलग 23 वर्षांपर्यंत बंगालचे मुख्यमंत्री होते. त्यांनी 21 जून, 1977 रोजी बंगालच्या मुख्यमंत्री पदाची धुरा आपल्या हाती घेतली होती. ते 5 नोव्हेंबर, 2000 पर्यंत मुख्यमंत्री पदावर होते.