TMC तटस्थ! उपराष्ट्रपती निवडणुकीची समीकरणे बदलली; अल्वा यांची मते १७५ हून कमी राहणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 12:23 PM2022-07-23T12:23:12+5:302022-07-23T12:24:36+5:30
यशवंत सिन्हा यांना मतदान केलेल्या तृणमूलने या निवडणुकीत तटस्थतेचा पवित्रा घेतला आहे.
शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना २०८ मते मिळाली असली तरी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना मिळणाऱ्या मतांची संख्या १७५हून कमीच राहील. सिन्हा यांना मतदान केलेल्या तृणमूलने या निवडणुकीत तटस्थतेचा पवित्रा घेतला आहे.
सिन्हा यांना तृणमूल कॉंग्रेसच्या आमदार, खासदारांची मते मिळाली होती. मात्र, ममता बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने अल्वा यांना त्यांच्या लोकसभेच्या २३ व राज्यसभेच्या १३ खासदारांची मते मिळणार नाहीत.
अल्वा यांना काँग्रेसचे ८४ सदस्य, द्रमुकचे ३४, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नऊ, राजदचे सहा, समाजवादी पार्टीचे सहा अशा प्रकारे १४० मते मिळू शकतात. याशिवाय त्यांना आम आदमी पार्टी व अन्य काही छोट्या पक्षांच्या खासदारांचीही मते मिळण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपचे जगदीप धनखड यांना याहून कमी मते मिळणार नाहीत, असे चित्र आहे. धनखड यांना आतापर्यंत भाजप, जदयू, अपना दल (सोनेलाल), एआयएडीएमके, लोक जनशक्ती पार्टी, एनपीपी, एमएनएफ, एनडीपीपी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांसारख्या पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे.