Bangladesh Violence : "बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होतायत; टीएमसी गप्प, फक्त भाजपलाच चिंता"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 12:04 PM2021-10-18T12:04:19+5:302021-10-18T12:05:10+5:30
भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे, की 'यांच्या' ढोंगीपणाचा बुरखा आता फाटला आहे.
कोलकाता - बांगलादेशातील मंदिरे आणि दुर्गापूजा पेडॉलवरील हल्ल्यांबाबत तृणमूल काँग्रेस आणि विचारवंतांच्या एका वर्गावर भाजपने निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे, की यांच्या ढोंगीपणाचा बुरखा आता फाटला आहे. भाजप प्रवक्ते समीक भट्टाचार्य यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दावा केला, की "ट्विटरवर सक्रिय असणारे टीएमसीचे नेते आणि त्यांच्या जवळच्या सुप्रसिद्ध व्यक्तींनी बांगलादेशातील दुर्गा पूजेच्या वेळी अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर झालेल्या हल्ल्याचा साधा निषेधही केलेला नाही. त्यांचा निशाणा टीएमसी नेते कुणाल घोष यांच्यावर होता.
भट्टाचार्य म्हणाले, ‘‘आपल्या दुकानातल्या मेणबत्त्या संपल्या होत्या का? आम्हाला, या हल्ल्यांच्या निषेधार्थ कुठली मेणबत्ती रॅली दिसली नाही.'' याचवेळी, शेजारील देशांतील अल्पसंख्यक नागरिकांची प्रामाणिकपणे चिंता करणारा भाजप हा एकमेव पक्ष असल्याचेही ते म्हणाले. तेसेच, ‘‘आम्ही हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर जिहादींनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो," असेही ते म्हणाले.
दक्षिण आशियात राबवला जातोय इस्लामिक अजेंडा -
काँग्रेस खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी (Manish Tewari) यांनी रविवारी एक ट्विट केले आहे. दक्षिण आशियात एक मोठा इस्लामीक अजेंडा काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तिवारी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, "काश्मीरमध्ये बिगर मुस्लिमांची हत्या, बांगलादेशात हिंदूंची हत्या आणि पुंछमध्ये 9 जवानांचे हौतात्म्य यात काही संबंध आहे का? कदाचित असे आहे. दक्षिण आशियात एक मोठा इस्लामिक अजेंडा काम करत आहे."
बांगलादेशातही धार्मिक हिंसाचार -
बांगलादेशात एका अफवेनंतर दुर्गापुजा पेंडॉलवर हल्ले करण्यात आले आणि हिंदू देवतेच्या मूर्ती तोडण्यात आल्या. तेथे अनेक जिल्ह्यांत तणावाचे वातावरण आहे. तेथील नवाखली येथे शुक्रवारी नमाननंतर जमावाने इस्कॉन मंदिरावर हल्ला केला होता. यावेळी श्रद्धाळूंना मारहाणही करण्यात आली. या हल्ल्यात एकाचा मृत्यूही झाला होता. आतापर्यंत, येथील धार्मिक हिंसाचारात मरणारांची संख्या 6 वर पोहोचली आहे. तर 200 हून अधिक हिंदू भाविक जख्मी झाल्याचे समजते.