विद्यार्थ्यांचा 'ममता बॅनर्जी झिंदाबाद' म्हणण्यास नकार; तृणमूल कार्यकर्त्यांची प्राध्यापकाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 06:11 PM2019-07-25T18:11:30+5:302019-07-25T18:16:39+5:30
वाद सोडवायला गेलेल्या प्राध्यापकादेखील कार्यकर्त्यांकडून मारहाण
कोलकाता: तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप एका प्राध्यापकानं केला. ममता बॅनर्जी झिंदाबाद, तृणमूल झिंदाबादच्या घोषणा देण्यास नकार दिल्यावरुन हा प्रकार घडला. तृणमूलच्या विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी काही विद्यार्थ्यांना जबरदस्तीनं घोषणा देण्यास सांगितलं. त्यावरुन तापलेलं वातावरण शांत करण्यासाठी प्राध्यापकानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तृणमूलच्या तरुण कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.
विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे प्राध्यापकाच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी प्राध्यापकानं उत्तरपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 'तृणमूलच्या विद्यार्थी परिषदेचे सदस्य असलेले कायम बेशिस्तीनं वागतात. मात्र मी त्यांची नावं सांगू शकत नाही. अन्यथा मला महाविद्यालयाच्या परिसरात पाय ठेवता येणार नाही,' अशी भीती मारहाणीत जखमी झालेल्या नाबाग्राम हिरालाल पॉल महाविद्यालयाचे प्राध्यापक सुब्रता चट्टोपाध्याय यांनी व्यक्त केली.
'तृणमूलच्या विद्यार्थी परिषदेचे सदस्य त्यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या महिला विद्यार्थ्यांशी गैरवतन करत होते. त्यावेळी मा आणि माझ्यासोबत असलेल्या इतर प्राध्यापकांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. इतर विद्यार्थ्यांनी माफी मागावी अशी मागणी वरिष्ठ विद्यार्थ्यांनी केली. त्यानंतर तृणमूलच्या विद्यार्थी परिषदेचे सदस्यांनी त्यांना ममता बॅनर्जी झिंदाबाद आणि तृणमूल झिंदाबाद घोषणा देण्यास सांगितलं. मात्र विद्यार्थ्यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी मलादेखील मारलं,' अशी आपबिती त्यांनी सांगितली.