शिक्षक भरती घोटाळ्यात TMC युवा अध्यक्षांचे नाव, ईडीकडून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 01:24 PM2023-06-30T13:24:08+5:302023-06-30T13:24:22+5:30
गेल्या मंगळवारी ईडीने सायोनी घोष यांना नोटीस पाठवली होती.
कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात आता तृणमूल युवा काँग्रेसच्या अध्यक्षा सायोनी घोष यांचे नाव समोर आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सायोनी घोष यांना समन्स बजावले होते. यानंतर तृणमूल युवा काँग्रेसच्या अध्यक्षा आणि अभिनेत्री सायोनी घोष शुक्रवारी सकाळी ११:२१ वाजता कोलकाता येथील ईडीच्या मुख्यालय सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये हजर झाल्या. गेल्या मंगळवारी ईडीने सायोनी घोष यांना नोटीस पाठवली होती.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील शिक्षक भरतीप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केलेले तृणमूल काँग्रेसचे निलंबित युवा नेते कुंतल घोष यांची चौकशी केल्यानंतर सायोनी घोष यांचे नाव समोर आले. कुंतल घोष यांच्या संपत्ती प्रकरणाच्या तपासादरम्यान सायानी घोष यांचे नाव समोर आले. ईडीला याच संदर्भात सायोनी घोष यांची चौकशी करायची आहे. दरम्यान, सायोनी घोष यांना ईडीने समन्स बजावण्याची ही पहिलीच वेळ असली तरी, शिक्षक भरती प्रकरणाच्या चौकशीदरम्यान त्यांचे नाव यापूर्वीही समोर आले आहे. तसेच, शिक्षक भरती प्रकरणात अडकलेले कुंतल घोष आणि सायोनी घोष एकाच मंचावर दिसले होते.
शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी युवा अध्यक्षा सायोनी घोष यांनी अद्याप जाहीरपणे भाष्य केले नाही. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंतल घोष यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे सायोनी घोष यांचे नाव भरती प्रकरणात पुढे आले आहे. त्यांना आयकर भरण्याची फाइल आणि मालमत्तेचा हिशेब आणण्यास सांगण्यात आल्याचे समजते. तसेच, यात सर्व बँक खात्याचे तपशील आणि व्यवहाराची कागदपत्रे आणण्यास सांगितले आहे. दरम्यान, सायोनी घोष अलीकडेच झालेल्या पंचायत निवडणुकीत व्यस्त होत्या. यानंतर आता समन्सला उत्तर देण्यासाठी सायोनी घोष शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या आहेत.