राजीव गांधींच्या अकाली मृत्यूचे टीएन शेषन यांना आधीच मिळाले होते संकेत; 'तो' सल्ला...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 03:08 PM2023-06-09T15:08:49+5:302023-06-09T15:09:22+5:30
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८५ मध्ये एसपीजी सुरक्षा बनवली गेली जेणेकरून पंतप्रधानांना चोख सुरक्षा देता येईल. १९८८-८९ मध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप कायद्याला संसदेत मंजुरी मिळाली
नवी दिल्ली - राजीव गांधी यांच्या हत्येला काँग्रेस सरकार त्यांच्या सुरक्षेतील हलगर्जीला जबाबदार मानते. १९८९ मध्ये जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार बनले तेव्हा राजीव गांधी यांना मिळालेली स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची सुरक्षा हटवली होती. परंतु जर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी टीएन शेषन यांचा एक सल्ला ऐकला असता तर ८९ मध्ये त्यांची सुरक्षा हटवली गेली नसती.
भारतातील निवडणूक आयोगाचे सुधारक मानले जाणारे टीएन शेषन यांनी राजीव गांधी यांना माजी पंतप्रधानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना एसपीजी सुरक्षा देण्याचा सल्ला दिला होता. परंतु राजीव गांधी यांनी तो सल्ला न ऐकता तो प्रस्ताव फेटाळला. भविष्यातील सुरक्षेसाठी हे स्वार्थी पाऊल असेल असे राजीव गांधींना वाटले. त्यावेळी शेषन हे पर्यावरण मंत्रालयाचे सचिव आणि पंतप्रधानांचे सुरक्षा इन्चार्ज होते. टीएन शेषन यांचा हा खुलासा त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेले नवीन पुस्तक थ्रू द ब्रोकन ग्लासमध्ये झाला आहे. ज्योतिषावर विश्वास असणाऱ्या टीएन शेषन यांना राजीव गांधींसोबत अघटित घडणार असल्याचे संकेत मिळाले होते.
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८५ मध्ये एसपीजी सुरक्षा बनवली गेली जेणेकरून पंतप्रधानांना चोख सुरक्षा देता येईल. १९८८-८९ मध्ये स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप कायद्याला संसदेत मंजुरी मिळाली. जेव्हा कायदा तयार होत होता तेव्हा टीएन शेषन यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना सल्ला दिला होता की, एसपीजी सुरक्षेच्या अंतर्गत माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांचाही समावेश करावा. माजी निवडणूक मुख्य आयुक्त टीएन शेषन यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात हा खुलासा झाला आहे. शेषन यांचे १० नोव्हेंबर २०१९ रोजी निधन झाले.
इंग्लिश न्यूज वेबसाईटनुसार, एका रिपोर्टमध्ये या पुस्तकातील या भागाचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात शेषन यांनी राजीव गांधी यांना त्यांचा सल्ला दिल्याचे सांगितले होते. शेषन यांनी राजीव गांधींना सतर्क केले होते. पंतप्रधानपदावरून दूर झाल्यानंतर राजीव गांधींच्या सुरक्षेला धोका होऊ शकतो. यासाठी अमेरिकेचे उदाहरण देत एफबीआय माजी राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा दिली जाते असं सांगितले. परंतु राजीव गांधी यांनी या प्रस्तावावर सहमती दर्शवली नाही. मी त्यांना समजवण्याचा बराच प्रयत्न केला परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही.
पुस्तकात शेषन यांनी ज्योतिषशास्त्रातील त्यांची आवडही नमूद केली आहे. राजीव गांधींच्या अकाली मृत्यूची पूर्वकल्पनाही त्यांनी दिली होती. त्यामुळेच शेषन यांनी राजीव गांधींना मे १९९१ च्या निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या सुरक्षेची काळजी घेण्याचा सल्लाही दिला होता. १० मे १९९१ रोजी टीएन शेषन यांनी राजीव गांधी यांची वैयक्तिक भेट घेतली आणि त्यांना मोहिमेदरम्यान सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. पण माजी पंतप्रधानांनी चिंता फेटाळून लावली. १७ मे रोजी शेषन यांनी राजीव यांना एक फॅक्स पाठवून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास सांगितले, परंतु त्यांचा संदेश वाचण्याआधीच २१ मे रोजी श्रीपेरुंबदुर येथे आत्मघातकी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.