"भारत विश्वगुरू बनण्यासाठी वेद, संस्कृत भाषेचा अधिक अभ्यास करावा"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 10:24 AM2023-04-24T10:24:47+5:302023-04-24T10:31:24+5:30
सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
साबरकांठा : विश्वगुरू बनण्यासाठी भारताने वेद आणि संस्कृत भाषेचा अधिक अभ्यास केला पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. श्री भगवान याज्ञवल्क वेदतत्त्वज्ञान योगाश्रम ट्रस्टच्या वतीने गुजरातमधील मुडेती गावामध्ये आयोजिलेल्या वेद संस्कृती ज्ञान गौरव समारंभात ते बोलत होते.
मोहन भागवत यांनी सांगितले की, भारतीय संस्कृती ही कधीही सनातनी नव्हती. या संस्कृतीत काळानुसार योग्य बदल झाले. कोणी काय खावे किंवा काय खाऊ नये अशी बंधने भारतीय संस्कृतीने कधीच घातलेली नाहीत. या देशात निर्माण झालेल्या वेदांतील तत्त्वांचे पालन प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. भारताने आपला विकास जरूर साधावा, पण अमेरिका, चीन, रशियाप्रमाणे सत्तापिपासू महाशक्ती बनण्याची गरज नाही.
ते म्हणाले की, भारताने आपल्या योग्य आचरणातून जगाला शांतता, प्रेम आणि समृद्धीचा मार्ग दाखवणारा देश बनले पाहिजे. भारत हा सर्वांची एकजूट साधणारा, विश्वगुरू बनण्याची इच्छा असलेला देश आहे. या गोष्टींसाठी वेद किंवा वेदविज्ञान, संस्कृती यांचे ज्ञान जोपासण्याची, वाढविण्याची आवश्यकता आहे. हे सारे ज्ञान संस्कृत भाषेत आहे. त्यामुळे संस्कृत शिकणेही आवश्यक आहे. संस्कृत भाषा, संगीताचे ज्ञान असेल तर विज्ञानाच्या अनेक संकल्पना सुलभरीत्या शिकता येतात, असे अनेक तज्ज्ञांचे मत असल्याचे मोहन भागवत यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
मोहन भागवत म्हणाले की, युक्रेन-रशिया युद्धात दोन्ही देशांना भारताने आपल्या बाजूने उभे राहावे असे वाटत आहे. मात्र दोन्ही देश आपले मित्र आहेत, अशी भारताने घेतलेली भूमिका योग्य आहे.