सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी भाजपाने आखला खास प्लॅन, समोर आला असा फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 10:02 AM2022-12-20T10:02:44+5:302022-12-20T10:32:26+5:30
BJP News : लोकसभेच्या २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीला आता अवघ्या दीड वर्षाचा अवधी उरला आहे. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीतही विजयाचा झेंडा रोवण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
नवी दिल्ली - लोकसभेच्या २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीला आता अवघ्या दीड वर्षाचा अवधी उरला आहे. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीतही विजयाचा झेंडा रोवण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपाने एक खास गेमप्लॅन बनवला आहे. त्यासाठी १६० चा नवा फॉर्म्युला समोर आणण्यात आला आहे. भाजपाच्या संघटनात्मक पातळीवरील नेत्यांनी भाजपाध्यक्ष जेपीनड्डा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामध्ये निवडणुकीपासून ते आतापर्यंच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला.
भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षासाठी कठीण मानल्या गेलेल्या १६० जागांची निवड केली आहे. या जागा जिंकण्यावर भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे. याआधी भाजपाने या मोहिमेसाठी १४४ जागांची निवड केली होती. या जागांपैकी बहुतांश ठिकाणी भाजपाला पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान जेडीयू एनडीएपासून दूर गेल्यानंतर भाजपाने जेडीयूच्या ताब्यात असलेल्या १६ जागांचा समावेशही या मोहिमेत करण्यात आल्याने आता या मिशनमधील जागांची संख्या ही १६० एवढी झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकीमध्ये भाजपा बिहार आणि तेलंगाणामध्ये पक्षाचा विस्तार करण्यावर भाजपाने विशेष भर दिला आहे. पक्षाने पाटणा आणि हैदराबादमध्ये आपल्या विस्तारकांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. पाटणामध्ये होणाऱ्या बैठकीत ९० लोकसभेच्या जागा आणि हैदराबादमध्ये होणाऱ्या बैठकीत ७० जागांवर लक्ष केंद्रीत केले जाईल.
देशातील विविध राज्यांतील या कठीण जागांवर २०१९ च्या लोकसभेमध्ये भाजपाच्या उमेदवारांना पराभत पत्करावा लागला होता. मात्र भाजपाने आता अशी यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये काही जिंकलेल्या जागांचाही समावेश होता. मात्र काही सामामाजिक आणि राजकीय कारणांमुळे या जागा आव्हान बनलेल्या आहेत.