मुलाकडे रोल्स रॉयस, नोकरांकडे iPhone; तंबाखू व्यावसायिकाच्या घरावरील छाप्याची Inside Story
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 10:31 AM2024-03-06T10:31:44+5:302024-03-06T10:32:56+5:30
कानपूर, दिल्ली, अहमदाबादसह तंबाखू कंपनीच्या अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर आयकर पथकाने सुमारे 5 कोटी रुपये रोख, 2.5 कोटी रुपयांचे दागिने, 6 कोटी रुपयांची घड्याळं आणि 60 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या कार जप्त केल्या आहेत.
कानपूरच्या बंशीधर तंबाखू कंपनीचे मालक के के मिश्रा आणि त्याच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर पाच दिवस आयकर विभागाने छापे टाकले. या छाप्यात आयकर अधिकारीही आश्चर्यचकित झाले. या कंपनीने आपली उलाढाल केवळ 20 कोटी रुपये दाखवली होती, परंतु घरातून जप्त केलेल्या आलिशान कार, महागडी घड्याळं आणि रोख रक्कम याचे व्यावसायिकाने खोटे आकडे दिल्याचे स्पष्ट झाले. तंबाखू कंपनीची वास्तविक उलाढाल सुमारे 200 कोटी रुपयांची असल्याचेही तपासात समोर आले आहे.
कानपूर, दिल्ली, अहमदाबादसह तंबाखू कंपनीच्या अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर आयकर पथकाने सुमारे 5 कोटी रुपये रोख, 2.5 कोटी रुपयांचे दागिने, 6 कोटी रुपयांची घड्याळं आणि 60 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या कार जप्त केल्या आहेत. आता मूल्यांकनानंतर कंपनीला मोठा दंड ठोठावण्याची तयारी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आयकर विभागाचे अधिकारी के के मिश्रा यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले तेव्हा त्यांचा मुलगा शिवम मिश्रा याने त्याचे लायसन्स असलेले पिस्तूल आणले आणि ते त्यांना दाखवले. मात्र अधिकाऱ्यांनी ते कोण आहेत हे सांगितल्यावर तो शांत झाला.
केअरटेकरसह अनेक कर्मचाऱ्यांकडे आयफोनचे लेटेस्ट मॉडेल
व्यावसायिकाचा मुलगा शिवम मिश्रा याने दिलेल्या माहितीनुसार, त्याला वाटलं की ते दरोडा टाकण्यासाठी त्याच्या घरी आले आहेत. म्हणून त्याने पिस्तूल दाखवलं. त्याच्याकडे पिस्तुलाचं लायसन्स आहे. छाप्यादरम्यान नोकरांचीही चौकशी करण्यात आली. घरातील स्वयंपाकी आणि केअरटेकरसह अनेक कर्मचाऱ्यांकडे आयफोनचे लेटेस्ट मॉडेल असल्याचं पाहून आयटी अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटलं. के के मिश्रा यांनी त्यांना ते दिलं होतं. यावरून तंबाखूच्या व्यावसायिकाकडे खूप संपत्ती आहे याचा अंदाज लावता येतो.
स्विमिंग पूलसाठी एवढे पाणी कुठून व कसे येते?
गुजरातमधील एका गावातील बंशीधर तंबाखू कंपनीच्या कारखान्यात इन्कम टॅक्सचे पथक पोहोचले. तिथे राहण्यासाठी के के मिश्रा यांनी आलिशान बंगला बांधला आहे. त्यात लाखो लीटर पाण्याची क्षमता असलेला स्विमिंग पूल बांधण्यात आला आहे. हा असा भाग आहे जिथे पाण्याची कमतरता आहे. अशा स्थितीत स्विमिंग पूलसाठी एवढे पाणी कुठून व कसे येते, यासाठी प्रशासनाने परवानगी कशी दिली? असे प्रश्नही निर्माण झाले आहेत.
आलिशान वाहनांचा ताफा
बंशीधर तंबाखू कंपनीचे मालक के के मिश्रा यांचा मुलगा शिवम मिश्रा याच्याकडे आलिशान वाहनांचा ताफाही सापडला आहे. यामध्ये लॅम्बोर्गिनी आणि फेरारी सारख्या कारचा समावेश आहे. त्याच्या दिल्लीतील घरातून 16 कोटी रुपयांची रोल्स रॉइस फँटम कारही सापडली आहे. त्याच्याकडे असलेल्या सर्व वाहनांचा नंबर 4018 आहे. एक प्रिया स्कूटर देखील सापडली आहे, जी बरीच जुनी आहे. त्याचा नंबरही 4018 आहे. मिश्रा कुटुंबीय प्रिया स्कूटरला लकी मानतात.
या तंबाखू कंपनीवर मोठ्या प्रमाणावर करचोरीचा आरोप होता. त्यानंतर हा छापा टाकण्यात आला आहे. कंपनीवर येथे कच्चा माल विकल्याचा आरोप होता. आरोपानुसार, कानपूरच्या नयागंज येथील बंशीधर एक्सपोर्ट आणि बंशीधर टोबॅको प्रायव्हेट लिमिटेड कोट्यवधी रुपयांची तंबाखू विकत होते, परंतु प्रत्येकाची एंट्री दाखवत नव्हते. आयकर विभागाने 50 कोटी रुपयांच्या व्यवहारांच्या काही स्लिप्सही जप्त केल्या आहेत.