१० कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप
By admin | Published: September 2, 2015 02:30 AM2015-09-02T02:30:49+5:302015-09-02T02:30:49+5:30
कामगार कायद्यातील बदलांविरुद्ध दहा केंद्रीय कामगार संघटनांनी आज बुधवारी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. भाजपासमर्थित भारतीय मजदूर संघ
नवी दिल्ली : कामगार कायद्यातील बदलांविरुद्ध दहा केंद्रीय कामगार संघटनांनी आज बुधवारी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला आहे. भाजपासमर्थित भारतीय मजदूर संघ आणि भारतीय कामगार संघटनांच्या राष्ट्रीय आघाडीने संपातून अंग काढून घेतले असले तरी बँक आणि विमा कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे आवश्यक सेवांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने चर्चा सुरूच ठेवण्याचे संकेत देतानाच देशहितासाठी संप मागे घेण्याचे आवाहन केले असून, आवश्यक सेवांवर प्रभाव पडणार नसल्याचा दावाही सरकारने केला आहे.
दहा केंद्रीय कामगार संघटनांचे देशभरातील सार्वजनिक व खासगी क्षेत्रात १५ कोटी सदस्य आहेत. गेल्या आठवड्यात ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांच्या गटासोबत झालेल्या चर्चेची अपेक्षित निष्पत्ती न निघाल्याने या संघटना संपावर ठाम राहिल्या होत्या. संपाचा फटका जीवनावश्यक सेवांना बसू शकतो. वाहतुकीसह वीज, गॅस आणि तेल पुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे या संघटनांनी म्हटले आहे. याउलट भामसंने सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांचा मोठा वर्ग सहभागी होणार नसल्यामुळे आवश्यक सेवांच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार नसल्याचा दावा केला आहे. खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील सुमारे १५ कोटी कामगार-कर्मचारी या संपात उतरतील, असे संपकरी संघटनांचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
---------
अंगणवाडी सेविका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, घरकामगार, गिरणी, कंत्राटी कामगार अशा संवर्गातील कामगारांनी या संपाला पाठिंबा देत संपात उतरण्याची घोषणा केली आहे.
तर फेरीवाले, रिक्षा व टॅक्सी चालक यांनी संपाला पाठिंबा दिला असला तरी संपात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी सेवेत खंड पडू नये, म्हणून काळ्या फिती लावून संपाला पाठिंबा दर्शवण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारी कर्मचारी महासंघाने संपात न उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रभाकर देसाई यांनी दिली.