रिक्षापेक्षा विमान प्रवास स्वस्त; केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 10:49 AM2018-09-04T10:49:33+5:302018-09-04T10:51:43+5:30
जयंत सिन्हा यांच्याकडून विमान आणि रिक्षा प्रवासाची तुलना
नवी दिल्ली : सध्याच्या घडीला विमान प्रवास रिक्षा प्रवासापेक्षा स्वस्त झाला आहे, असं केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये बोलत असताना सिन्हा यांनी रिक्षा आणि विमान प्रवासाची तुलना केली. सध्या अनेक विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर कमी आले आहेत. त्याचा संदर्भ देत सिन्हा यांनी विमान प्रवास किफायतशीर झाल्याचं सांगितलं.
सोमवारी जयंत सिन्हा टर्मिनल भवनचं उद्घाटन करण्यासाठी गोरखपूरला आले होते. त्यावेळी त्यांनी रिक्षा आणि विमान प्रवासाच्या दरांची तुलना केली. 'मी तुमच्यासमोर काही आकडे सांगू इच्छितो. त्यावरुन विमान उड्डाण क्षेत्रात कशी क्रांती घडली आहे, याची कल्पना तुम्हाला येईल', असं सिन्हा यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलं. यानंतर त्यांनी विमान आणि रिक्षा प्रवासाच्या भाड्याची तुलना केली. 'आज दोनजण रिक्षानं गेल्यास 10 रुपये प्रति किलोमीटरच्या दरानं प्रवास भाडं देतात. म्हणजे एका व्यक्तीला एक किलोमीटर प्रवासामागे 5 रुपये इतका खर्च येतो. मात्र तुम्ही हवाई प्रवास करत असाल, तर तुम्हाला एक किलोमीटर प्रवासासाठी फक्त 4 रुपये द्यावे लागतात,' अशी आकडेवारी त्यांनी सांगितली.
देशातील दळणवळण क्षेत्रात क्रांती होत असल्याचं जयंत सिन्हा यांनी केली. 'विमान वाहतूक क्षेत्रात घडलेली क्रांती डोळ्यात भरणारी आहे. यामुळे प्रवासी वाहतूक अतिशय स्वस्त झाली आहे. भाजपा सत्तेत येण्याआधी देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांची संख्या 6 कोटी इतकी होती. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा आकडा 12 कोटींवर जाईल. देशातील विमानतळांची संख्यादेखील 75 वरुन 100 वर पोहोचली आहे,' असं सिन्हा यांनी सांगितलं. 'आधी रांचीत 8-10 विमानं यायची. आता तिथे 30 विमानांची ये-जा होते. अलाहाबाद, कानपूर, जेवर, गोरखपूर या विभागांचाही वेगानं विस्तार होत आहे,' अशी माहिती त्यांनी दिली.