आज हनुमान जयंती: हनुमान एक, मात्र जन्मस्थानांचे दावे अनेक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 12:46 AM2021-04-27T00:46:15+5:302021-04-27T06:49:54+5:30
हनुमानाचा जन्म अंजनाद्री पर्वतावर झाल्याचा दावा.
नवी दिल्ली : झारखंड, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रानंतर आता आंध्र प्रदेशात तिरुमला तिरुपती देवस्थान संस्थेने हनुमानाचा जन्म अंजनाद्री पर्वतावर झाल्याचा दावा केला आहे. हा दावा कर्नाटक सरकारने फेटाळला असून, कोप्पल जिल्ह्यात अंजनेयनाद्री पर्वतावर हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे श्रीराम भक्त हनुमानाच्या जन्मभूमीवरून भारतात वाद सुरू झाला आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानने २१ एप्रिलला रामनवमीच्या निमित्ताने पौराणिक, भौगोलिक, तसेच पुरालेखविद्येवर आधारित पुरावे सादर केले. तिरुपती देवस्थान परिसरातील सात पर्वतांपैकी एक अंजनाद्री पर्वतावरच हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा केला. यासाठी देवस्थानने डिसेंबर, २०२० मध्ये ८ सदस्यीय समितीही स्थापन केली होती. समितीने काही मुद्दे मांडले, तसेच तिरुमला मंदिरावरील १४९१ ते १५४५ या कालावधीतील काही शीलालेखांचाही दाखला समितीने दिला. शीलालेखांमध्ये अंजनाद्री पर्वत हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा उल्लेख असल्याचे या समितीने म्हटले आहे.
पौराणिक आधार
ब्रिटिश लायब्ररीतील ‘अंजनाद्री महात्म्यम’ या डिजिटली स्वरूपातील हस्तलिखितातही याचा स्पष्ट उल्लेख असल्याचे समितीने म्हटले आहे, तसेच काही पौराणिक काव्यांमध्येही अंजनाद्री पर्वतावरील हनुमान जन्मस्थानाबाबत भौगोलिक स्थानाचा उल्लेख आढळतो, असे समितीने म्हटले आहे.
कर्नाटकचाही दावा
कर्नाटकमध्ये कोप्पल जिल्ह्यात अनेगुंडीजवळ किश्कींधा येथे हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा कर्नाटकने केला आहे. हम्पीजवळ किश्कींधा डोंगरांचा उल्लेख रामायणात आढळतो. याच ठिकाणी राम, लक्ष्मण आणि हनुमानाची भेट झाल्याचा उल्लेख पौराणिक संदर्भात करण्यात आला आहे.