“आज देशाकडे सक्षम नेतृत्व, कोणत्याही परिस्थितीत भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोहचणार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 11:33 AM2020-05-30T11:33:21+5:302020-05-30T11:37:28+5:30
संरक्षणमंत्री म्हणाले, मला देशाला हे आश्वासन द्यायचे आहे की, कोणत्याही परिस्थितीत भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोहचणार नाही.
नवी दिल्ली - चीनसोबत लडाख सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लवकरच या समस्येचा तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे. लष्करी व मुत्सद्दी पातळीवर दोन्ही देशांमधील वाटाघाटी सुरूच आहेत. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना राजनाथ म्हणाले की, आज देशाकडे सक्षम नेतृत्व आहे. देशाची मान झुकू देणार नाही. देशातील जनतेला यावरही विश्वास आहे. नेपाळबरोबर लिपुलेख वादाच्या वाटाघाटीचे निराकरण करण्याचीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
संरक्षणमंत्री म्हणाले, मला देशाला हे आश्वासन द्यायचे आहे की, कोणत्याही परिस्थितीत भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोहचणार नाही. भारत कोणालाही डोळे वटारून पाहत नाही, सीमेवरील पायाभूत सुविधांच्या बांधकामाबाबत चीनच्या आक्षेपांवर बोलताना ते म्हणाले की, हा आमचा हक्क आहे. आम्ही जे काही करत आहोत ते आमच्या सीमेत करत आहोत. पायाभूत सुविधा तयार करण्याचा आमचा अधिकार आहे. शेजारील देशांशी चांगले संबंध राखण्याचे भारताचे स्पष्ट धोरण आहे. आमचे प्रयत्न बर्याच काळापासून सुरू आहेत. कधीकधी अशा परिस्थिती चीनबरोबर उद्भवतात. मे महिन्यातही अशा परिस्थिती उद्भवल्या आहेत. पण सामंजस्याने समस्या सोडवण्याचा आमच प्रयत्न सुरूच आहे. चिनी राष्ट्रपतींच्या वतीने हेदेखील स्पष्टपणे सांगितले होते की, मुत्सद्दी चर्चेद्वारे हे प्रकरण सोडवायचे आहे असं संरक्षण मंत्री म्हणाले.
तसेच कोणत्याही परिस्थितीत तणाव वाढू नये, हा भारताचा प्रयत्न आहे. आवश्यक असल्यास सैन्य पातळीवर आणि मुत्सद्दी स्तरावर वाटाघाटी दूर केल्या पाहिजेत. लष्करी व मुत्सद्दी पातळीवर चीनशी चर्चा सुरू आहे. भारत आणि चीन यांच्यात तिसऱ्याने मध्यस्थी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही काल अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांशी संवाद साधला. आम्ही त्यांना सांगितले की, भारताने यापूर्वीच एक यंत्रणा विकसित केली आहे ज्या अंतर्गत चीनशी वाद झाल्यास ते सैन्य व मुत्सद्दी वाटाघाटीद्वारे त्या सोडवतात असं राजनाथ सिंह म्हणाले.
दरम्यान, नेपाळबरोबर लिपुलेख वादाबाबत राजनाथ सिंह म्हणाले की, हे वाटाघाटीद्वारे सोडवले जाऊ शकते. नेपाळशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. तो भारताचा धाकटा भाऊ आहे. वाटाघाटीद्वारे हे प्रकरण सोडवेल. अलीकडेच नेपाळने लिपुलेखला आपला भाग असल्याचे सांगून हा वादग्रस्त नकाशा प्रसिद्ध केला होता.