Petrol-Diesel Price Hike: आजचा शेवटचा दिवस? पेट्रोल-डिझेल दरवाढ होण्याची शक्यता; युपीमध्ये अखेरच्या टप्प्यातील मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 08:11 AM2022-03-07T08:11:13+5:302022-03-07T08:11:36+5:30
Fuel Price Hike: येत्या १० तारखेनंतर किंवा आजपासूनच भारतामधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये लीटरला १५ ते २२ रुपयांपर्यंत वाढ होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क : रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू झालेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या बॅरलला ११८ डॉलरपर्यंत हे दर गेले असून, ते अधिक वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. याचा परिणाम म्हणून येत्या १० तारखेनंतर किंवा आजपासूनच भारतामधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये लीटरला १५ ते २२ रुपयांपर्यंत वाढ होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. कारण आज उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्याचे मतदान होत आहे. मतदान संपताच दरवाढ करण्यास कंपन्या सुरु करू शकतात.
निवडणूक आणि पेट्रोलचे दर
भारतामधील पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये दररोज बदल होत असतो. मात्र, पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्यामुळे सध्या दर जैसे थे राहिले आहेत.
१० मार्च रोजी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून, निवडणूक आचारसंहिता संपणार आहे. त्यामुळे त्यानंतर देशातील इंधनाच्या दरामध्ये मोठी वाढ होऊ शकते. गेल्या १५ दिवसांमध्ये तेल कंपन्यांना झालेला तोटा भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
जागतिक बाजारात भडका
रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर बॅरलला ९७ डॉलर होते. ते आता वाढून ११८.१ डॉलर प्रतिबॅरल असे झाले आहेत. आगामी सप्ताहामध्ये हे दर १२५ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे भारतीयांच्या खिशाला इंधनाच्या दरवाढीची झळ सहन करावी लागणार, हे नक्कीच आहे.
सरकार देऊ शकते काही सवलत
देशातील जनतेला इंधन भाववाढीचा मोठा फटका बसू नये, यासाठी सरकारकडून काही प्रमाणामध्ये सवलत दिली जाऊ शकते. इंधनावरील अबकारी कराच्या दरामध्ये कपात करून सरकार वाढत्या किमतींना काही प्रमाणामध्ये आळा घालू शकते.
मुंबईमध्ये सध्या पेट्रोल १०९.९८ रुपये, तर डिझेल ९४.१४ रुपये प्रति लीटर असे विकले जात आहे.