जीसॅट-९ उपग्रहाचे आज प्रक्षेपण

By admin | Published: May 5, 2017 01:24 AM2017-05-05T01:24:38+5:302017-05-05T01:24:38+5:30

जीसॅट-९ या दक्षिण आशिया दूरसंचार उपग्रहाच्या उड्डाणाची नियोजनाप्रमाणे व्यवस्थित तयारी सुरू असून, या

Today launch of the GSAT-9 satellite | जीसॅट-९ उपग्रहाचे आज प्रक्षेपण

जीसॅट-९ उपग्रहाचे आज प्रक्षेपण

Next

 चेन्नई : जीसॅट-९ या दक्षिण आशिया दूरसंचार उपग्रहाच्या उड्डाणाची नियोजनाप्रमाणे व्यवस्थित तयारी सुरू असून, या उपग्रहामुळे दक्षिण आशियायी देशांच्या परस्परांतील संपर्काला उत्तेजन मिळेल, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी गुरुवारी येथे सांगितले. या उपग्रहाचे प्रक्षेपण ५ मे रोजी केले जाणार आहे.
या भूस्थिर दूरसंचार उपग्रहाची बांधणी इस्रोने केली असून, येथून सुमारे १०० किलोमीटरवरील श्रीहरिकोटातील सतीश धवन अवकाश केंद्रावरून त्याला शुक्रवारी सायंकाळी ४.५७ मिनिटांनी आकाशात सोडले जाईल. सार्क देशांच्या आठपैकी भारतासह सात देश या प्रकल्पाचे सदस्य आहेत. पाकिस्तानने ‘आमचा स्वत:चा अवकाश कार्यक्रम’ असल्याचे सांगून या प्रकल्पातून अंग काढून घेतले आहे.
इस्रोचा अग्निबाण जीएसएलव्ही-एफ०९ ने या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाईल. याला २३५ कोटी रुपये खर्च आला असून, तो शेजारच्या देशांना १२ केयू बँड ट्रान्सपाँडर्समार्फत सेवा देईल.  या उपग्रहाचे आयुष्य १२ वर्षांचे आहे. 
या उपग्रहाचा उद्देश हा दक्षिण अशियायी भागात देशांना दूरसंचार आणि संकटकाळात मदत आणि परस्परांत संपर्क उपलब्ध व्हावा असा आहे. या उपग्रहामुळे सहभागी देशांना डीटीएच, काही विशिष्ट व्हीसॅट क्षमता उपलब्ध करून देईल. याशिवाय देशांना संकटकाळी एकमेकांना माहिती पाठवण्यास मदत करील, असे कुमार विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यावर त्यांनी इस्रोला सार्क उपग्रह विकसित करण्यास सांगितले होते. हा उपग्रह भारताकडून शेजारच्या देशांना भेट दिला जाऊ शकेल, असा त्यांचा विचार होता. ३० एप्रिल रोजी मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या मासिक ‘मन की बात’ कार्यक्रमात दक्षिण आशिया उपग्रह हा शेजारच्या देशांना भारताकडून अमूल्य भेट असेल, असे जाहीर केले होते. 

 

Web Title: Today launch of the GSAT-9 satellite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.