आज शक्तिपरीक्षा, बहुमत सिद्ध करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 06:48 AM2018-05-19T06:48:26+5:302018-05-19T14:14:47+5:30
कर्नाटकात सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला असून, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना आज ४ वाजता विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगितले आहे.
नवी दिल्ली/बंगळुरू : कर्नाटकात सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला असून, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना आज ४ वाजता विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगितले आहे. तो मंजूर होईपर्यंत धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत तसेच अँग्लो इंडियन सदस्याची विधानसभेवर नियुक्ती करू नये, असेही बजावले आहे.
येडियुरप्पांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याच्या निर्णयाला आव्हान देणा-या काँग्रेस व जनता दल यांच्या याचिकेवरील सुनावणीनंतर न्या ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण व न्या. शरद बोबडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. येडियुरप्पा यांचा काल शपथविधी झाला, पण त्यांना ते उद्या बहुमत कसे सिद्ध करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस, जनता दल व अन्य तीन अपक्ष आमदार हैदराबादमधील हॉटेलातून निघाले आहेत. काँग्रेसचे ७७ व अन्य तीन असे ८0 आमदार एकत्र आहेत, असे काँग्रेस नेते राजशेखर रेड्डी पाटील यांनी सांगितले. आमदारांना उद्या ११ वाजता विधानसभेत आणले जाईल. आमदार फोडण्याची संधी भाजपाला मिळू नये, म्हणून हे करण्यात आले आहे. दरम्यान, जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी आपले दोन आमदार भाजपाने पळवल्याचा आरोप करीत ते पुन्हा पक्षात परततील, असा दावा केला आहे. सदस्यांचा शपथविधीनंतर लगेच विश्वासदर्शक ठराव मांडून त्यावर हात वर करून मतदान व्हावे, असेही न्यायालयाने बजावले आहे. त्याचे चित्रिकरण करण्याची काँग्रेसचे अॅड. अभिषेक मनु सिंघवी यांची विनंतीही न्यायालयाने मान्य केली आहे.
>पैसे व बळाच्या वापराची काँग्रेसला भीती
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच, त्यामुळे लोकशाही प्रस्तापित होण्यास मदत होईल, असे सांगत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली. बहुमत नसूनही येनकेन प्रकारेण ते सिद्ध करण्यासाठी भाजपा पैसा व बळाचा वापर करेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. भाजपा बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांना पैशाद्वारे फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनीही आरोप केला आहे.
>बहुमत निश्चितच सिद्ध करू
विधानसभेत आपण बहुमत निश्चितच सिद्ध करू, असा दावा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केला. भाजपाचे नेते व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही भाजपा बहुमत सिद्ध करेल, असे सांगितले
>आठवड्याचा अवधी नाकारला
बहुमत सिद्ध करण्यासाठी एक आठवड्याचा अवधी द्यावा, ही भाजपाचे अॅड. मुकुल रोहटगी यांची विनंती न्यायालयाने अमान्य केली. विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी किती अवधी द्यावा, हा राज्यपालांचा अधिकार असून, त्यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, हा युक्तिवादही मान्य झाला नाही.
>पैशाचे आमिष;
आली ध्वनिफीत
काँग्रेसच्या रायचूरमधील एका आमदाराला पैशाचे आश्वासन देऊ न फोडण्याचा प्रयत्न भाजपाचे जनार्दन
रेड्डी करीत असल्याची एक ध्वनिफीत काँग्रेसने जारी केली आहे.