आज जगभर योग‘लाट’

By admin | Published: June 21, 2015 01:16 AM2015-06-21T01:16:52+5:302015-06-21T01:16:52+5:30

आज रविवार २१ जून रोजी भारतासह जगभरातील १९१ देशांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येत असून याची जय्यत तयारी झाली आहे.

Today 'Yoga' | आज जगभर योग‘लाट’

आज जगभर योग‘लाट’

Next

नवी दिल्ली : आज रविवार २१ जून रोजी भारतासह जगभरातील १९१ देशांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येत असून याची जय्यत तयारी झाली आहे. विशेष म्हणजे भारतानेच संयुक्त राष्ट्रासमक्ष योगदिनाच्या आयोजनाचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला १९३ पैकी १७७ देशांनी पाठिंबा दिला. विशेष म्हणजे ४७ मुस्लीम देशांचेही याला समर्थन मिळाले.
योगदिनानिमित्त देशातील लखनौ, कोलकाता, पाटणासह बहुतांश राज्यांमध्ये असंख्य ठिकाणी योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या दिनाची नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
भारतासोबतच लंडन, मेलबर्न, दुबई, बुडापेस्ट, हो चिन्ह मीन, हाँगकाँग, पोर्ट लुईस, पॅरिस, जकार्ता, बर्लिन, न्यूयॉर्क आणि बोगोटासह जगभरातील २५१ वर मोठ्या शहरांमध्ये योगदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक मुस्लीम देशांमध्येसुद्धा योगाभ्यासासाठी चटया घालण्याचे काम सुरू आहे. राजधानी दिल्लीत राजपथावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध पक्षांचे नेते, बॉलिवूडचे कलाकार, सशस्त्र दलाचे जवान, शाळकरी विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचा सहभाग असणार आहे. जगात प्रथमच साजरा होत असलेल्या आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमाची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी राजपथ सज्ज झाला आहे. एकाच स्थळी ४५ हजार लोकांनी एकसाथ योगासने करण्याचा हा विक्रम असणार आहे. यापूर्वी कन्याकुमारीतील एका स्वयंसेवी संघटनेच्या योग कार्यक्रमात १९ नोव्हेंबर २००५ रोजी २९,९७३ लोक सहभागी झाले होते. याशिवाय गिनीज बुकमध्ये एकसाथ ५० देशांमधील लोक योग कार्यक्रमात सहभागी झाल्याची नोंद आहे.
राजपथवर सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी योगाभ्यास सुरू होईल. यावेळी ३५ मिनिटांच्या कालावधीत १५ योगासने करण्यात येतील. कार्यक्रम ऋग्वेदातील श्लोकाने सुरू होईल आणि त्यानंतर मुक्तासन, मकरासन, कपालभारती, प्राणायाम आदी योगाभ्यास केले जातील. सशस्त्र दलाच्या तीनही सेना तसेच निमलष्करी दलांचा या कार्यक्रमात सक्रिय सहभाग आहे. दरम्यान, विविध देशांमधील भारतीय दूतावासांसाठी योगावर आधारित कॉफीटेबल बुकच्या ७ हजारांवर प्रती आणि १९,००० संदर्भ पुस्तिका पाठविण्यात आल्या आहेत. इंग्लंडमध्ये योगदिन मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. भारतीय दूतावासातर्फेही टेम्स नदीच्या दक्षिण किनाऱ्यावरील स्पेन गार्डनमध्ये योग कार्यक्रम होईल. अमेरिकेच्या शिकागो शहरात अल्पसंख्यक मंत्री नजमा हेपतुल्ला यांच्या नेतृत्वात योगदिन समारंभ पार पडेल.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

संयुक्त राष्ट्र मुख्यालयातही योगा
रविवारी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी व्यापक स्तरावर तयारी सुरू आहे. मुख्य कार्यक्रम संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आयोजित करण्यात येणार असून त्यात भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून, आमसभेचे अध्यक्ष सॅम कुतेसा, अमेरिकी काँग्रेसचे सदस्य तुलसी गबार्ड, भारतीय आध्यात्मिक गुरू श्रीश्री रविशंकर भाग घेतील. यावेळी बान यांचे मार्गदर्शन होईल.
न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर येथे ३० हजार लोक योगाभ्यास करणार असून विशाल इलेक्ट्रॉनिक पडद्यांवर त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, युनो आमसभेचे अध्यक्ष उपस्थित राहतील.

Web Title: Today 'Yoga'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.