आज योगींची पहिली परीक्षा, उत्तर प्रदेशात 10 जागांवर भाजपा, पाच जागांवर बसप आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 10:27 AM2017-12-01T10:27:47+5:302017-12-01T10:30:38+5:30
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांची आज पहिलीच परीक्षा होत आहे. देशभरातील राजकीय विश्लेषकांचे या निवडणुकीच्या निकालाकडे बारीक लक्ष असेल.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांची आज पहिलीच परीक्षा होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये आज 16 महानगरपालिका, 198 नगरपालिका आणि 438 नगरपंचायतीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीचा काय निकाल लागतो त्यावर योगी आदित्यनाथ यांच्या आठ महिन्याच्या कार्यकाळाचे मुल्यमापन केले जाईल.
या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत महापौरांच्या 16 जागांचे कौल हाती आले असून भाजपा 10 ठिकाणी आघाडीवर आहे. मायावतींच्या बसपानेही पुनरागमन केले आहे. बसपा 5 ठिकाणी आघाडीवर आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकीय विश्लेषकांचे या निवडणुकीच्या निकालाकडे बारीक लक्ष असेल तसेच या निकालांना मोदी लाटेशीही जोडले जाईल. या निवडणुकीचा थेट गुजरात निवडणुकीशी संबंध नसला तरी निकालावरुन देशात राजकीय वारे कुठल्या दिशेने वाहतेय ते स्पष्ट होईल.
फेब्रुवारी महिन्यात जाहीर झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाने घवघवती यश मिळवले होते. भारतीय जनता पार्टी तब्बल 312 जागा जिंकून उत्तर प्रदेशची सत्ता मिळवली होती. त्यामुळे आता उत्तर प्रदेशच्या जनतेचा काय मूड आहे ते या निकालातून समजेल.