भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर केरळमध्ये आज सर्वपक्षीय बैठक
By Admin | Published: July 8, 2015 11:43 PM2015-07-08T23:43:44+5:302015-07-08T23:43:44+5:30
केरळमध्ये भटक्या कुत्र्यांनी लोकांना एवढे ‘सळो की पळो’ करून सोडले आहे की, राज्य सरकारला या समस्येवर चर्चा करण्यासाठी चक्क सर्वपक्षीय बैठक बोलवावी लागली आहे.
थिरुअनंतपूरम : केरळमध्ये भटक्या कुत्र्यांनी लोकांना एवढे ‘सळो की पळो’ करून सोडले आहे की, राज्य सरकारला या समस्येवर चर्चा करण्यासाठी चक्क सर्वपक्षीय बैठक बोलवावी लागली आहे. ही अनोखी बैठक गुरुवारी होईल.
केरळमध्ये भटक्या कुत्र्यांनी गेल्या सहा महिन्यांत ७५,००० लोकांना चावा घेतला असून त्यांचा हा उच्छाद असाच सुरू राहिल्यास पीडितांची संख्या यावर्षी दीड लाखापर्यंत जाऊ शकते. २०१४ मध्ये भटक्या कुत्र्यांनी ९० हजार जणांना चावा घेतला होता.
भटक्या कुत्र्यांचा उच्छाद ही राज्यातील गंभीर समस्या बनली आहे, असे सूत्राने सांगितले. दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या मुद्यावर चर्चेसाठी गुरुवारी (९ जुलै) आपण सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, असे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले होते. एका विधानसभा सदस्याने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चंडी बोलत होते. भटक्या कुत्र्यांना कायद्याचे संरक्षण आहे. त्यामुळे त्यांना ठार मारता येत नाही, असे प्राणीप्रेमींचे म्हणणे आहे; मात्र ते तितकेसे खरे नाही, असे या आमदारांनी सांगितले. (वृत्तसंस्था)