श्रीदेवीच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार , विशेष विमानाने पार्थिव मंगळवारी रात्री आणले मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 04:18 AM2018-02-28T04:18:40+5:302018-02-28T04:18:40+5:30
अभिनेत्री श्रीदेवी हिच्या मृत्यूची दुबईतील सर्व चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली असून, तिचा मृतदेह मंगळवारी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
दुबई/ मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी हिच्या मृत्यूची दुबईतील सर्व चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली असून, तिचा मृतदेह मंगळवारी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. एका विशेष विमानाने बोनी कपूर आणि इतर नातेवाईक मृतदेह घेऊन रात्री मुंबईत दाखल झाले. बुधवारी श्रीदेवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.
श्रीदेवीचा मृत्यू दुर्घटनेत बुडून झाल्याचे स्पष्ट केले आणि या प्रकरणी तर्कवितर्कांना विराम दिला. श्रीदेवीचे पती बोनी कपूर व अर्जुन कपूर यांच्यासह नातेवाइकांनी मंगळवारी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह सुस्थितीत राहावा, यासाठी रासायनिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तो शवागृहात नेण्यात आला. दुबई सरकारच्या मीडिया कार्यालयाने टिष्ट्वट करून, हे प्रकरण संपल्याचे स्पष्ट केले.
दुपारी अंत्ययात्रा
श्रीदेवीचे पार्थिव अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील सेलिब्रेशन क्लबमध्ये सकाळी
९.३० पासून ११.३० पर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. दुपारी २ वाजता तेथून अंत्ययात्रा निघेल. पवनहंसजवळील विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.